Satara: कोयना धरणक्षेत्रात पावसाची हजेरी, महाबळेश्वरला सर्वाधिक पाऊस
By नितीन काळेल | Published: September 8, 2023 04:29 PM2023-09-08T16:29:02+5:302023-09-08T16:29:25+5:30
पावसाचे प्रमाण कमीच
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाला सुरुवात झाली असून कोयना धरणक्षेत्रात १० दिवसानंतर हजेरी लावली. तर महाबळेश्वरला सर्वाधिक ४७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, कोयना धरणात ८५ टीएमसीवर पाणीसाठा आहे.
जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यातच मान्सूनचा पाऊसही जिल्ह्यात उशिरा सुरु झाला. जून महिन्याच्या उत्तरार्धात सुरु झालेला पाऊस जुलैच्या पहिल्या १५ दिवसांपर्यंत पडत होता. पश्चिम भागातच पडणाऱ्या या पावसामुळे धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, कोयनेसह उरमोडी धरणात पाणीसाठा वाढला. याचदरम्यान, पूर्व दुष्काळी भागात मात्र पावसाची उघडीप होती. असे असतानाच जुलैच्या उत्तरार्धानंतर पाऊस कमी झाला. आॅगस्ट महिन्यात तर पावसाची मोठी दडी होती. यामुळे प्रमुख मोठे पाणीप्रकल्प अजुन भरलेले नाहीत. आतातर सप्टेंबर सुरु असूनही पावसाचे प्रमाण कमीच आहे.
जिल्ह्याच्या पूर्व दुष्काळी भागात काही ठिकाणी पाऊस झाला आहे. पण, पूर्वेकडे गुरुवारपासून पावसास सुरुवात झाली. यामुळे १० दिवसांनंतर पाऊस पडला आहे. तसेच प्रमुख धरणक्षेत्रातही पावसाला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे २३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर नवजा येथे ३७ आणि महाबळेश्वरला ४७ मिलीमीटर पाऊस पडलेला आहे.
एक जूनपासूनचा विचार करता सर्वाधिक पाऊस नवजा येथे ५०८८ मिलीमीटर झालेला आहे. तर कोयनानगर येथे सर्वात कमी ३५५४ आणि महाबळेश्वरला ४७९४ मिलीमीटर पडला आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास कोयना धरणात ३२०४ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणसाठा ८५.३७ टीएमसी झाला होता. धरणाच्या पायथा वीजगृहातून १०५० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरूच आहे.