महाबळेश्वरचा पाऊस एक हजारी, सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर कमी 

By नितीन काळेल | Published: July 5, 2023 12:35 PM2023-07-05T12:35:55+5:302023-07-05T12:36:16+5:30

कोयना धरणातून होणारा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला

Rainfall in Mahabaleshwar crossed the one thousand millimeter mark, Satara district west is less | महाबळेश्वरचा पाऊस एक हजारी, सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर कमी 

महाबळेश्वरचा पाऊस एक हजारी, सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर कमी 

googlenewsNext

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असलातरी महाबळेश्वरच्या पर्जन्यमानाने एक हजार मिलीमीटरचा टप्पा ओलांडला आहे. नवजा येथेही आतापर्यंत ८७३ मिलीमीटरची नोंद झालेली आहे. तर कोयना धरणातील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत असून बुधवारी सकाळी १५.७६ टीएमसी झाला होता.

जिल्ह्यात २५ जूनपासून मान्सूनचा पाऊस सक्रिय झाला. त्यावेळी पूर्व आणि पश्चिम भागात एकाचवेळी पावसाला सुरुवात झाली. पण, पूर्व भागात अवघ्या तीन दिवसांत पावसाने उघडीप दिली. तर पश्चिम भागात जोर धरला होता. मागील आठ दिवस कोयनेसह नवजा, कास, बामणोली, तापोळा, महाबळेश्वरला दमदार पाऊस झाला. यामुळे ओढे, नाले खळाळू लागले आहेत. तसेच पावसामुळे कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी सारख्या प्रमुख धरणांतील पाणीसाठाही हळूहळू वाढू लागला. त्यामुळे पाऊस सुरू झाल्यानंतर कोयना धरणात जवळपास पाच टीएमसी पाणीसाठा वाढलेला आहे. 

बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे अवघा १० मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. तर नवजा येथे २२ आणि महाबळेश्वरला २५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्याचबरोबर एक जूनपासूनचा विचार करता आतापर्यंत कोयनानगरला ६१४, नवजा येथे ८७३ मिलीमीटरची नोंद झालेली आहे. तर महाबळेश्वरला १,०११ मिलीमीटर पाऊस पडला आहे.

बुधवारी सकाळच्या सुमारास कोयना धरणात ५ हजार ८६१ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणात १५.७६ टीएमसी पाणीसाठा झाला होता. पाऊस कमी झाल्याने धरणातील आवकवरही परिणाम झालेला आहे. तर तीन दिवसांपासून धरणातून होणारा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे.

साताऱ्यात ढगाळ वातावरण...

सातारा शहरात बुधवारी सकाळी पाऊस झाला नाही. मात्र, दुपारपर्यंत ढगाळ वातावरण कायम होते. त्यानंतर पावसाचा काही भागात शिडकावा झाला. मात्र, मागील आठ दिवसांत साताऱ्यात बुधवारी प्रथमच पावसाचे प्रमाण एकदम कमी झाल्याचे दिसून आले.

Web Title: Rainfall in Mahabaleshwar crossed the one thousand millimeter mark, Satara district west is less

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.