सातारा जिल्ह्यात पश्चिम भागात पाऊस; नवजा, महाबळेश्वरला हजेरी
By दीपक शिंदे | Published: June 16, 2023 12:15 PM2023-06-16T12:15:53+5:302023-06-16T12:16:15+5:30
पूर्व भागात वरुणराजाची प्रतीक्षा
सातारा : जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस दाखल झाला असून पश्चिमेकडील कोयना, नवजा, महाबळेश्वरलाच दररोज हजेरी लागत आहे. मात्र, दुष्काळी भागात अजूनही वरुणराजाची प्रतीक्षा आहे. तर एक जूनपासून आतापर्यंत कोयनेला ५३ तर महाबळेश्वरला ७७ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. कोयना धरणात ११.९२ टीएमसी साठा राहिला आहे.
जिल्ह्यात यावर्षी उन्हाळ्यात वळवाचे पाऊस कमी झाले. तर मान्सूनचा पाऊसही उशिरा दाखल झाला. आता जून महिना मध्यावर आला तरी मान्सूनच्या पावसाचा जोर नाही. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. गेल्या काही दिवसांत पश्चिम भागातील कोयना, नवजा, कास, बामणोली, तापोळा, महाबळेश्वर या भागात पाऊस पडत आहे. पण, या पावसातही जोर नाही. गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत काेयनेला १३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर नवजा येथे ८ आणि महाबळेश्वरला २ मिलिमीटर पर्जन्यमान झाले. एक जूनपासून आतापर्यंत कोयना व नवजा येथे प्रत्येकी ५३ मिलिमीटर पाऊस झाला. तर महाबळेश्वरला ७७ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.
जिल्ह्याच्या पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव तसेच खंडाळा, वाईसह कऱ्हाड तालुक्यातही पाऊस नाही. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणीवर परिणाम झाला आहे. पेरणीसाठी पुरेसा पाऊस होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे. त्यातच कृषी विभागाने ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस किंवा जमिनीत ४ ते ६ इंच ओल झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असे आवाहन केलेले आहे.
कोयनेतून विसर्ग सुरूच...
कोयना धरणात यंदा गतवर्षीपेक्षा कमी पाणीसाठा राहिलेला आहे. गुरुवारी सकाळच्या सुमारास धरणात ११.९२ टीएमसी साठा होता. याचा अर्थ धरणात ११.३२ टक्के साठा राहिला आहे. त्यातच धरणाच्या पायथा वीजगृहातून १०५० क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. तर जिल्ह्यातील कण्हेर, उरमोडी, धोम, बलकवडी, तारळी या प्रमुख धरणांतीलही पाणीसाठा खालावला आहे. पाऊस नसल्याने कोणत्याच धरणात पाण्याची आवक सुरू नाही. तर सिंचनासाठी मागणी असल्याने धरणांतून पाणी सोडले जात आहे.