Satara: जुलैत पावसाचे प्रमाण चांगले; कोयना धरणातील पाणीसाठा ४२ टीएमसीवर पोहोचला
By नितीन काळेल | Published: July 16, 2024 06:19 PM2024-07-16T18:19:45+5:302024-07-16T18:20:40+5:30
२४ तासांत नवजा २० तर महाबळेश्वरला १७ मिलीमीटरची नोंद
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात दोन दिवस पावसाने दमदार हजेरी लावली असलीतरी सोमवारपासून उघडझाप सुरू आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे फक्त ८ तर नवजा २२ आणि महाबळेश्वरला १७ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. तर कोयना धरणातील आवकही कमी झाली असलीतरी पाणीसाठा ४२ टीएमसीवर पोहोचलाय.
जिल्ह्यात जुलै महिना सुरू झाल्यापासून पावसाचे प्रमाण चांगले राहिले आहे. तरीही पावसाची उघडझाप चिंता वाढवत आहे. शनिवार आणि रविवारी पश्चिम भागात जोरदार पाऊस झाला. कास, बामणोली, तापोळा, बामणोलीसह कोयना, नवजा, महाबळेश्वरला पावसाने झाेडपले. सातारा शहरातही जोरदार पाऊस पडला. तसेच वाई, कऱ्हाड, जावळी तालुक्यातही पाऊस बरसला. पण, सोमवारपासून पाऊस कमी झाला आहे. त्यातच सूर्यदर्शनही घडत आहे. मंगळवारीही जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाची उघडीप कायम होती. अपवादात्मक स्थितीत पाऊस होत आहे.
मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. कोयनानगर येथे ८ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर एक जूनपासून आतापर्यंत १ हजार ९९० मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. नवजा येथे आतापर्यंत सर्वाधिक पाऊस पडला. दीड महिन्यात २ हजार ३१९ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर महाबळेश्वरला आतापर्यंत १ हजार ७६९ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.
त्याचबरोबर कोयना धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे आवकही कमी झाली आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास सुमारे १९ हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणातील पाणीसाठा ४२.०६ टीएमसी झालेला.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची उघडझाप सुरू आहे. तर सातारा शहरात ढगाळ वातावरण राहत आहे. काहीवेळा सूर्यदर्शनही घडत आहे. तर पूर्व भागात पावसाची उघडीप कायम आहे. खरीप हंगामातील पिके चांगली आली असून भांगलणी सुरू झाली आहे.