Satara: कोयनेचा पाऊस दोन हजारी; धरणात एक टीएमसीने वाढ
By नितीन काळेल | Published: July 17, 2024 07:17 PM2024-07-17T19:17:23+5:302024-07-17T19:18:43+5:30
जून महिन्याच्या तुलनेत जुलैमध्ये पावसाचे प्रमाण चांगले
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असून २४ तासांत महाबळेश्वरला सर्वाधिक ३५ मिलीमीटरची नोंद झाली. तर यावर्षी आतापर्यंत सर्वाधिक पर्जन्यमान नवजाला २ हजार ३३८ मिलीमीटर झाले आहे. तसेच कोयनेच्या पावसानेही दोन हजार मिलीमीटरचा टप्पा ओलांडलाय. धरणात एक टीएमसीने वाढ झाली. त्यामुळे धरणसाठा ४३.०९ टीएमसीवर पोहोचला आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात जून महिन्याच्या तुलनेत जुलैमध्ये पावसाचे प्रमाण चांगले राहिले. कास, बामणोली, तापोळा, नवजा, कोयना, महाबळेश्वरसह कांदाटी खोऱ्यात पाऊस पडत आहे. तरीही या पावसात सातत्य नाही. कधी पावसाचा जोर राहतो. तर काहीवेळा उघडझाप सुरू असते. त्यातच चार दिवसांपूर्वी दमदार पाऊस झाला होता. मात्र, त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी होत गेले. सध्या तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी आहे. त्यामुळे धरणातील साठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही.
बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे फक्त ११ मिलीमीटर पाऊस पडला. तर नवजाला १९ मिलीमीटरची नोंद झाली आहे. एक जूनपासूनचा विचार करता कोयनानगरला आतापर्यंत २ हजार ०१ मिलीमीटर तर महाबळेश्वर येथे १ हजार ८०४ मिलीमीटर पाऊस पडला. यंदा महाबळेश्वरच्या पावसाचे प्रमाण कमी आहे. तर कोयना धरणक्षेत्रातही पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याचीही आवक कमी आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास धरणात ११ हजार ८४४ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणातील पाणीसाठ्यात २४ तासांत एक टीएमसीने वाढ झाली आहे. सकाळी ४३.०९ टीएमसी साठा झालेला.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असला तरी पूर्व भागात उघडीप आहे. सातारा शहरातही बहुतांशीवेळा ढगाळ वातावरण राहत आहे. कधीतरी रिमझिम स्वरुपाचा पाऊस होत आहे.
कोयनेत १७ टीएमसी पाणीसाठा अधिक
जिल्ह्यात गेल्यावर्षी पर्जन्यमान कमी झाले होते. १७ जुलैपर्यंत कोयनानगर येथे १ हजार ९४ मिलीमीटर पाऊस झालेला. तर नवजा येथे १ हजार ५८६ आणि महाबळेश्वरला १ हजार ५७१ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली. त्या तुलनेत यंदा अधिक पाऊस आहे. तसेच कोयना धरणातही गतवर्षीच्या तुलनेत सुमारे १७ टीएमसीने पाणीसाठा अधिक आहे. गतवर्षी १७ जुलैपर्यंत २६.१६ टीएमसी पाणीसाठा झालेला.