महाबळेश्वरचा पाऊसही चार हजारी; कोयनेत ७५ टक्के पाणीसाठा
By नितीन काळेल | Published: August 3, 2023 12:03 PM2023-08-03T12:03:07+5:302023-08-03T12:09:49+5:30
कोयना, नवजा आणि महाबळेश्वर परिरसरात पावसाची संततधार कायम
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून २४ तासांत सर्वाधिक पाऊस नवजा आणि महाबळेश्वरला प्रत्येकी १३० मिलीमीटर झाला. तर आता महाबळेश्वरच्या पावसानेही आता चार हजार मिलीमीटरचा टप्पा गाठला. त्याचबरोबर कोयना धरणात ७८ टीएमसीवर पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे धरण ७५ टक्के भरले आहे.
जिल्ह्याच्या पश्चिमेकडे चार दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. असे असले तरी कोयना, नवजा आणि महाबळेश्वर परिरसरात पाऊस कायम आहे. तसेच पश्चिमेकडेच धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी आणि कोयनासारखी प्रमुख धरणे आहेत. या धरणांची एकूण साठवण क्षमता ही १४५ टीएमसीच्यावर आहे. या धरणक्षेत्रातही चांगला पाऊस झाल्याने पाणीसाठा झपाट्याने वाढत चालला आहे.
१०५.२५ टीएमसी क्षमतेच्या कोयना धरणात तर गुरुवारी सकाळच्या सुमारास ७८.२२ टीएमसी पाणीसाठा झाला होता. टक्केवारीत हे प्रमाण ७४.३२ झालेले आहे. तर धरणात येणाऱ्या पाण्याचीही आवक वाढली. गुरुवारी सकाळी ३० हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे लवकरच धरणातील पाणीसाठा ८० टीएमसीचा टप्पा ओलांडू शकतो. तर पायथा वीजगृहाची दोन्हीही युनीट सुरू आहेत. या युनीटमधून २१०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झालेली आहे.
गुरुवारी सकाळी ८ पर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ८७ मिलीमीटर पाऊस पडला. तर नवजाला आणि महाबळेश्वरला १३० मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे. तर एक जूनपासूनचा विचार करता आतापर्यंत सर्वाधिक पाऊस नवजा येथे ४२४५ मिलीमीटर झाला. त्यानंतर महाबळेश्वरला ३९७९ आणि कोयनानगरला ३०१० मिलीमीटर पडलेला आहे.