दडी मारलेल्या पावसाची साता-यात रिमझिम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 01:40 PM2018-06-17T13:40:07+5:302018-06-17T13:40:07+5:30
गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने सातारा शहर व परिसरात शनिवारी सायंकाळपासून रिमझिम सुरूवात केली आहे. तर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात अद्यापही पावसाला जोर नाही.
सातारा - गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने सातारा शहर व परिसरात शनिवारी सायंकाळपासून रिमझिम सुरूवात केली आहे. तर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात अद्यापही पावसाला जोर नाही. त्यामुळे धरणात आवक नाही. दुसरीकडे कोयनानगर येथे २४ तासांत अवघा १५ मिलीमिटर पाऊस झाला असून दुष्काळी भागात पुरेशा पावसाअभावी पेरण्या रखडल्या आहेत.
यावर्षी मान्सूनचे आगमन वेळेत झाले. सुरुवातीला साता-यासह पूर्व दुष्काळी भागातही अनेक ठिकाणी पावसाने चांगली हजेरी लावली. त्यामुळे शेतकºयांसह सर्वांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. पावसाने सुरूवात चांगली केल्याने पेरण्या होतील, असा विश्वास निर्माण झाला होता. पण, गेल्या सहा दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. पश्चिम भागातील झडी वगळता कोठेही पाऊस बरसला नाही. त्यामुळे शेतकºयांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. असे असतानाच शनिवारी सायंकाळपासून सातारा शहरासह परिसरात पावसाची रिमझिम सुरू आहे. रविवारी दुपारी बारानंतरही ही रिमझिम सुरू होती. त्यामुळे सूर्यदर्शन झाले नाहीच.
तसेच कोयना, धोम, बलकवडी, उरमोडी या धरणक्षेत्रात पावसाचा जोर अद्यापही नाही. त्यामुळे धरणात पाण्याची आवक सुरू झालेली नाही. दुसरीकडे दुष्काळी तालुक्यात पावसाची दडी शेतक-यांना चिंताग्रस्त करत आहे. कारण, सुरूवातीला पाऊस झाला. त्यानंतर अनेक गावांत पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. पाऊस वेळेत पडेल व पेरणी होईल, या आशेवर शेतकरी आहेत. येत्या काही दिवसांत पाऊस झाल्यास पेरणी होणार आहे. पावसाने ओढ दिली तर पेरणी रखडणार आहे.
धरणक्षेत्रातील २४ तासांतील व आतापर्यंतचा एकूण पाऊस
धोम ०२ (४७) कोयना १५ (२७६)
कण्हेर ०० (२८) बलकवडी ०७ (१२८)
तारळी ०० (५३) उरमोडी ०३ (३३)