चाफळ विभागात वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसाने पडझड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:42 AM2021-05-20T04:42:43+5:302021-05-20T04:42:43+5:30
चाफळ : पाटण तालुक्याच्या चाफळ विभागात गेल्या तीन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पडत असलेल्या पावसामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. ...
चाफळ : पाटण तालुक्याच्या चाफळ विभागात गेल्या तीन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पडत असलेल्या पावसामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. अनेकांच्या घरांवरील पत्रे उडून गेल्याने संसारोपयोगी साहित्य भिजून अनेक गावांतील कुटुंबे उघड्यावर पडली. वीजपुरवठा खंडित झाल्याने बहुतांश गावात नळ योजनेचा पाणीपुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागली.
चाफळसह विभागातील माजगाव कडववाडी, खराडवाडी, नाणेगाव खुर्द, केळोली, बाटेवाडी, धायटी, पाडळोशी, मसुगडेवाडी, नारळवाडी, तावरेवाडी, कवठेकरवाडी, सूर्याचीवाडी, डेरवण, वाघजाईवाडी, खोणोली, दाढोली, कोचरेवाडी आदी गावांत वादळी वाऱ्यासह पडत असलेल्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. शेतातील झाडांचे आंबे झडून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील उभे ऊस पीक भुईसपाट होऊन नुकसान झाले आहे. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.