पावसामुळे सातारा जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत; पाटण, महाबळेश्वरमधील लोकांचे स्थलांतर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 02:27 PM2022-07-13T14:27:18+5:302022-07-13T14:43:26+5:30
प्रशासन माहिती घेऊन उपाययोजना राबवत आहे
नितीन काळेल
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागातील पाऊस थांबण्याचे चिन्ह नसल्याने पाटण, सातारा, महाबळेश्वर, जावळी तालुक्यातील जनजीवन विस्कळीत होऊ लागले आहे. त्यामुळे सुरक्षिततेससाठी पाटण व महाबळेश्वरमधील १,१०० लोकांना तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले आहे. दमदार पावसामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढू लागला आहे. बुधवारी सकाळी कोयना धरणातील साठा ४० टीमएसीच्या उंबरवठ्यावर होता.
जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस चांगलाच सक्रिय झाला आहे. त्यामुळे गेल्या १० दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. कोयना, नवजा, तापोळा, कास, बामणोली, महाबळेश्वर आणि प्रतापगड परिसरात धो-धो पाऊस कोसळत आहे. यामुळे डोंगर उतारावरील रस्त्यावर दगड, माती येऊन वाहू लागली आहे. काही ठिकाणी रस्त्यावर दरड कोसळत आहेत. त्यामुळे दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
संभाव्य दुर्घटनेचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने पावले उचलली आहेत. त्यामुळे पाटण आणि महाबळेश्वर तालुक्यातील सुमारे १,१०० लोकांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आले आहे. जवळील शाळा, मंदिरे तसेच नातेवाईकांकडे हे स्थलांतर झाले आहे. तसेच प्रशासन माहिती घेऊन उपाययोजना राबवत आहे.
नवजा येथे १४२ मिलिमीटर पाऊस...
पश्चिम भागातील कोयना, नवजा आणि महाबळेश्वर भागात दमदार पाऊस होत आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १२३, नवजा १४२ आणि महाबळेश्वरला १३६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.