सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला; कोयना धरण पाणीसाठ्यात दीड टीएमसीने वाढ
By नितीन काळेल | Published: July 18, 2023 12:54 PM2023-07-18T12:54:08+5:302023-07-18T12:54:37+5:30
जिल्ह्याच्या पूर्व भागात अजूनही पावसाची दडी कायम
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर आणखी वाढला असून मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत महाबळेश्वरला सर्वाधिक १५० मिलीमीटरची नोंद झाली. तर कोयना धरणातही येणाऱ्या पाण्याचीही आवक वाढली आहे. त्यामुळे धरण पाणीसाठ्यात जवळपास दीड टीएमसीने वाढ झाली. सकाळच्या सुमारास २७.२७ टीएमसी पाणीसाठा झाला होता.
पश्चिम भागात चार दिवसांच्या उघडझापनंतर शनिवारपासून पावसाचा जोर वाढला. रविवारी आणि सोमवारीही पश्चिमेकडील कास, बामणोली, नवजा, कोयना, तापोळा तसेच महाबळेश्वर परिसरात जोरदार पाऊस पडला. यामुळे त्या भागातील ओढे, नाले पुन्हा भरुन वाहत आहेत. तसेच भात लागणीच्या कामालाही वेग आला आहे. मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत महाबळेश्वरला सर्वाधिक पाऊस १५० मिलीमीटर पडला. तर एक जूनपासून आतापर्यंत येथे १६६७ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे.
त्याचबरोबर २४ तासांत कोयनेला ७७ आणि नवजा येथे ९८ मिलीमीटर पाऊस पडला. तर जूनपासून कोयनानगर येथे ११४९ आणि नवजाला १६५७ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे. पश्चिम भागातील या पावसामुळे धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळीसह कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवकही वाढली आहे. सकाळच्या सुमारास कोयना धरणात १६ हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे पाणीसाठा २७.२७ टीएमसी झाला होता. २४ तासांत पाणीसाठ्यात जवळपास दीड टीएमसीने वाढ झालेली आहे. तरीही कोयनेत गतवर्षीपेक्षा कमीच पाणीसाठा आहे. पावसाने आणखी जोर धरुन सतत १५ दिवस पाऊस पडल्यास धरणपातळीत मोठी वाढ होईल, असा अंदाज आहे.
दरम्यान, जिल्ह्याच्या पूर्व भागात अजूनही पावसाची दडी कायम आहे. यामुळे खरीप हंगामातील पेरणी खोळंबलेली आहे. सध्या दुष्काळी भागात पेरणी होणार नाही. पण, रब्बी हंगामासाठीतरी चांगला पाऊस पडावा, अशी अपेक्षा बळीराजांची आहे.