जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढू लागला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:26 AM2021-07-16T04:26:39+5:302021-07-16T04:26:39+5:30
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढत असून, गुरुवारी सकाळपर्यंत कोयनाला ५२, नवजा ९९ आणि महाबळेश्वरला ५७ मिलिमीटर ...
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढत असून, गुरुवारी सकाळपर्यंत कोयनाला ५२, नवजा ९९ आणि महाबळेश्वरला ५७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर कोयना धरणात ४६ टीएमसीच्या वर पाणीसाठा झाला आहे. धरणात पाण्याची आवकही वाढत चालली आहे.
जिल्ह्यात जून महिन्याच्या मध्यावर मुसळधार पाऊस झाला होता. विशेषकरून पश्चिम भागात धुवाधार पाऊस झाला. यामुळे पश्चिमेकडील प्रमुख धरणांत पाणीसाठा वेगाने वाढण्यास सुरुवात झाली होती. तर शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग सुरू केली होती. असे असतानाच पावसाने दडी मारली होती. जवळपास २० दिवसांनंतर पावसाला सुरुवात झाली आहे.
गेल्या आठवड्यापासून पुन्हा पाऊस सुरू झाला. पण, या पावसात जोर नव्हता. पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळा, कोयना, नवजा आणि महाबळेश्वरलाही अल्प प्रमाणात पावसाची हजेरी होती. असे असतानाच तीन दिवसांपासून पावसाचा हळूहळू जोर वाढू लागला आहे. यामुळे पश्चिम भागातील धरणसाठ्यात वाढ होत आहे.
गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ५२ मिलिमीटर पाऊस झाला. तर जूनपासून कोयनानगरला ११७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. नवजाला ९९ मिलिमीटर पाऊस झाला होता. तर आतापर्यंत १५२६ मिलिमीटर पर्जन्यमान झाले आहे. महाबळेश्वरला ५७ मिलिमीटर तर जूनपासून १६०९ मिलिमीटर पाऊस पडला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत महाबळेश्वरला सर्वाधिक पावसाची नोंद झालेली आहे. कोयना धरणात सकाळच्या सुमारास ४६.०३ टीएमसी एवढा पाणीसाठा झाला होता. तर १६८७४ क्युसेक वेगाने पाणी आवक होत होती.
दरम्यान, पूर्व दुष्काळी तालुक्यात अजूनही मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा कायम आहे. सध्या पिकांना पाण्याची आवश्यकता आहे.
.......................................................