सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर मंदावला; कोयना धरणात पाण्याची आवक कमी
By नितीन काळेल | Published: July 27, 2024 06:41 PM2024-07-27T18:41:27+5:302024-07-27T18:42:02+5:30
आठवड्यानंतर सूर्यदर्शन, कोयना धरणात ७ दिवसांत ३२ टीएमसी पाणी..
सातारा : सातारा शहरासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात सहा दिवस कोसळणाऱ्या पावसाचा जोर कमी झाला आहे. २४ तासांत महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक १८२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर कोयना धरणातील पाणीसाठा ८३ टीएमसीवर पोहोचला आहे. त्यातच पावसाचा जोर मंदावल्याने धरणातील आवक कमी झाली आहे. साताऱ्यातही आठवड्यानंतर सूर्यदर्शन झाले.
जिल्ह्यात मागील रविवारपासून जोरदार पाऊस सुरू होता. पूर्व भागातही चांगला पाऊस झाला. यामुळे खरीप हंगामातील पिकांना फायदा झाला, तर पश्चिमेकडे कोसळधार होती. प्रमुख धरण पाणलोट क्षेत्रातही दमदार पाऊस झाला. यामुळे धरणातील पाणीसाठा वेगाने वाढला. मात्र, शुक्रवारपासून पावसाचा जोर मंदावला आहे. यामुळे सर्वच धरणांत पाण्याची आवक कमी होत आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ९३ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. नवजा येथे १०५ आणि महाबळेश्वरला १८२ मिलिमीटर पाऊस पडला आहे. सकाळच्या सुमारास कोयना धरणात सुमारे ४६ हजार क्युसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे धरणातील पाणीसाठा ८२.९८ टीएमसी झाला.
त्याचबरोबर कोयना धरणातून विसर्ग सुरूच आहे. पायथा वीज गृहाच्या दोन्ही युनिटमधून २ हजार १०० आणि सहा दरवाजांतून ३० हजार, असा एकूण ३२ हजार १०० क्युसेक पाणी विसर्ग केला जात होता. त्यामुळे कोयना नदीतील पाणीपातळी वाढलेलीच आहे. सातारा शहरातही सहा दिवसांनंतर पावसाची उघडझाप सुरू झाली. शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास सूर्यदर्शनही झाले. त्यानंतर रिमझिम पाऊस पडला.
कोयना धरणात ७ दिवसांत ३२ टीएमसी पाणी..
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात जुलै महिना सुरू झाल्यापासून चांगला पाऊस झाला. त्यातच मागील आठवड्यापासून कोसळधार होती. यामुळे धरणातील पाणीसाठा वेगाने वाढला. मागील सात दिवसांत धरणात ३२ टीएमसीहून अधिक पाणीसाठा वाढला आहे. तर सध्या कोयनेबरोबरच कण्हेर धरणातून विसर्ग सुरू आहे. वाई तालुक्यातील बलकवडी धरण क्षेत्रातही पावसाचा जोर होता. धरणात ३.३६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण ८२.३५ टक्के भरले आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.