पाऊस अन् धरण विसर्गही कमी, पूर उतरु लागला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 02:41 PM2020-08-19T14:41:00+5:302020-08-19T14:45:13+5:30
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असून धरणांमधील पाणीसाठाही हळू हळू वाढत आहे. त्यामुळे काही धरणांतील विसर्ग कमी करण्यात आला आहे. परिणामी जिल्ह्यातील पूरस्थिती उतरु लागली आहे. दरम्यान, नवजा आणि महाबळेश्वरच्या पावसानेही यावर्षीचा ४ हजार मिलिमीटरचा टप्पा पार केला.
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असून धरणांमधील पाणीसाठाही हळू हळू वाढत आहे. त्यामुळे काही धरणांतील विसर्ग कमी करण्यात आला आहे. परिणामी जिल्ह्यातील पूरस्थिती उतरु लागली आहे. दरम्यान, नवजा आणि महाबळेश्वरच्या पावसानेही यावर्षीचा ४ हजार मिलिमीटरचा टप्पा पार केला.
बुधवारी सकाळपर्यंत कोयनानगर येथे ७५ तर जूनपासून आतापर्यंत ३६७० मिलिमीटर पाऊस झाला. तर महाबळेश्वरला ९५ आणि आतापर्यंत ४०८३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर नवजाला सकाळपर्यंत ८६ आणि आतापर्यंत ४१६९ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
सकाळी ७ च्या सुमारास कोयना धरणात ५४६२९ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी पायथा वीजगृहातून २१०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. तर धरणाचे ६ दरवाजे १० फुटांवर होते. या दरवाजातून ५२५२९ क्यूसेक पाणी सोडण्यात येत होते. तर धरणसाठा ९१.२१ टीएमसी होता.
दरम्यान, सकाळी ११ च्या सुमारास कोयना धरणातून विसर्ग कमी करण्यात आला. दरवाजे ६ फुटांवर आणण्यात आले होते. त्यामधून २८९३७ आणि पायथा वीजगृहातून २१०० असा ३१०३७ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. हे पाणी कोयना नदी पात्रात जात आहे.