पावसाच्या दडीने बळीराजा हबकला!

By admin | Published: September 6, 2015 08:42 PM2015-09-06T20:42:11+5:302015-09-06T20:42:11+5:30

दुष्काळ जाहीर करा : विहिरींनी गाठला तळ; पिकेही करपली, पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याची तीव्र टंचाई

The rains of the victims were burnt! | पावसाच्या दडीने बळीराजा हबकला!

पावसाच्या दडीने बळीराजा हबकला!

Next

मसूर : अर्धा पावसाळा संपला तरी पाऊस गायब झाल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. पावसाअभावी अपेक्षित वाढ नसलेली खरीप पिके उन्हाच्या तीव्रतेने कोमेजून चालली आहेत. संभाव्य नुकसानाच्या भीतीने बळीराजा पुरता हबकला आहे. भूगर्भातील पाण्याची पातळीही खालावत चालल्याने शिवारातील विहिरींसह पिण्याच्या पाण्याच्या विहिरीसुद्धा तळ गाठू लागल्या आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह चारा टंचाईचे संभाव्य चित्र उभे आहे. राज्य शासनाने याची दखल घेऊन दुष्काळ जाहीर करण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे. जून महिन्याच्या पूर्वसंध्येला अवकाळी पावसाने हजेरी लावली, त्या ओलीचा फायदा घेत शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या. पावसाने पुन्हा उघडीप दिली. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनी टोकणीसाठी सऱ्या टाकल्या; मात्र अपेक्षेप्रमाणे पाऊसच झाला नाही. त्यामुळे ज्यांनी टोकणी केली, ती पिके मातीमोल झाली. तर ३० टक्के टोकणी झालीच नाही. जूनचा दुसरा टप्पा, जुलैमध्ये पावसाच्या हलक्या सरी पडल्या. काही प्रमाणात ओल निर्माण झाली, त्यानंतर केव्हा तरी सरी पडू लागल्या. त्यामुळे पिकांना जणू सलाईनसारखे पाणी मिळाले; मात्र अपेक्षित जोरदार पाऊस अद्याप झालाच नाही. काहीशा ओलीवर तग धरून असलेली व पावसाअभावी अपेक्षित वाढ नसलेली पिके मात्र उन्हाच्या तीव्रतेने कोमेजून जाण्याच्या मार्गावर आहेत. सध्या सप्टेंबर महिना सुरू झाला आहे. तरीही पावसाची चिन्हे नाहीत. अनेक नक्षत्र कोरडीच गेली आहेत. तालुक्यात ७० टक्के पेरण्या झाल्या असल्या तरी ऐन पावसाळ्यात उन्हाची तीव्रत्ता दिवसेंदिवस वाढू लागल्याने पिके कोमेजू लागल्याचे चित्र पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
मोठा पाऊसच झाला नसल्याने भूगर्भातील पाणीसाठा नष्ट होत चालला आहे. या पावसाळयात एकदाही नदी, ओढे, नाले, पाट भरून वाहिले नाहीत. ओढे, ओघळीही कोरडे पडत आहेत. शिवारातील विहिरींची पाण्याच्या पातळींनेही आता तळ गाठलेला दिसून येऊ लागला आहे. काहींच्या मोटारी दोन-तीन तासच चालतात. पुन्हा पाणी साठ्याअभावी बंद पडत आहेत. पिण्याच्या पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींचीसुध्दा पातळी घटू लागल्याने त्याचा पिण्याच्या पाणी पुरवठ्यावरही परिणाम होऊ लागला आहे. तालुक्यात बहुतांशी गावात सिमेंट बंधारे बांधले आहेत. (वार्ताहर)

मेघराजा कधी बरसणार...
सध्या भूगर्भातील उपलब्ध पाणीसाठा काटकसरीने वापरण्याची गरज निर्माण झाली आहे. भूगर्भातील पाणीसाठाही आता गंभीर रूप धारण करू लागल्याने पाण्यासाठी आणीबाणीची वेळ येवून ठेपली आहे. या सर्व वस्तुस्थितीने शेतकरी पुरता हबकला आहे. मेघराजा कधी बरसणार? यासाठी सर्वांचे डोळे आभाळाकडे लागून राहिले आहेत.

Web Title: The rains of the victims were burnt!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.