साताऱ्यात वेगवान वारे अन् पावसाची भुरभूर, पावसाळी वातावरण ; रेनकोट, जर्किन निघाले बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 01:20 PM2017-12-05T13:20:19+5:302017-12-05T13:23:03+5:30
भारतीय किनारपट्टीवर ओखी चक्रीवादळ धडकले असले तरी त्याचा परिणाम साताऱ्यातही जाणवायला लागला आहे. साताऱ्यात सोमवारी रात्री मुसळधार पाऊस झाला होता. मंगळवारी सकाळपासून सोसाट्याचे वारे वाहत असून भुरभूर पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पावसाळी वातावरण तयार झाले आहे.
सातारा : भारतीय किनारपट्टीवर ओखी चक्रीवादळ धडकले असले तरी त्याचा परिणाम साताऱ्यातही जाणवायला लागला आहे. साताऱ्यात सोमवारी रात्री मुसळधार पाऊस झाला होता. मंगळवारी सकाळपासून सोसाट्याचे वारे वाहत असून भुरभूर पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पावसाळी वातावरण तयार झाले आहे.
जिल्ह्यात गेल्या आठवड्यात कडक्याची थंडी पडलेली असतानाच दोन दिवसांत अचानक वातावरण बदलले. ढग जमा होत आहेत. त्यामुळे थंडी गायब झाली. सातारा, कऱ्हाड, कोरेगाव, खंडाळा, खटाव, वाई, तालुक्यात सोमवारी रात्री साडेसातच्या सुमारास चांगला पाऊस झाला. त्यामुळे नागरिकांची पळापळ झाली.
शहरात मंगळवारी सकाळपासून वेगाचे वारे वाहत असून काळे ढग जमा झाले आहेत. त्यामुळे अंधारून आले आहे. साडेदहापासून पावसाची भुरभूर सुरू झाली आहे. वातावरण पाहता मोठा पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने नोकरदार मंडळी घरातूनच रेनकोट, जर्किन किंवा गृहिणी छत्री घेऊन बाहेर पडत आहेत. वेगवान वाऱ्यामुळे वाहने चालवितानाही अवघड निर्माण होत आहेत. तसेच वातावरणात कमालीचा गारवाही निर्माण झाला आहे.