रिमझिम पावसात खेळिया रंगला रे!

By admin | Published: July 6, 2016 11:13 PM2016-07-06T23:13:41+5:302016-07-07T00:51:40+5:30

‘चांदोबाचा लिंब’मध्ये उभे रिंगण : टाळ-मृदंगांच्या गजरात ‘माउली’ तरडगावी मुक्कामी

Rainy rains play in the rain! | रिमझिम पावसात खेळिया रंगला रे!

रिमझिम पावसात खेळिया रंगला रे!

Next

राहिद सय्यद/बाळासाहेब बोचरे --तरडगाव
टाळ-मृदंगांचा गजर, मुखी ‘माऊली-माऊली’चा जयघोष, रोखलेला श्वास आणि अंगावर बरसणाऱ्या रिमझिम जलधारा अशा उत्कंठावर्धक व भक्तिमय वातावरणात वैष्णवांच्या मेळ्यातून माऊलींच्या अश्वाने वेगाने धाव घेत चांदोबाचा लिंब येथे वारीतील पहिले उभे रिंगण पूर्ण केले. त्यानंतर सारा आसमंत विठ्ठलनामाच्या जयघोषणात दुमदुमून गेला. हा नयनरम्य सोहळा लाखो भक्तांनी आपल्या डोळ्यांत साठविला.
लोणंद येथील एक दिवसाचा मुक्काम आटोपून माउलींचा पालखी सोहळा बुधवारी दुपारी एक वाजता खंडाळा तालुक्यातून फलटण तालुक्यातील तरडगावकडे मार्गस्थ झाला. दरम्यान, तालुक्याच्या सीमेवर सरहद्देचा ओढा येथे दुपारी अडीच वाजता आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य संजीवराजे नाईक-निंबाळकर, सभापती वैशाली गावडे, उपसभापती दिलीप अडसूळ, प्रांताधिकारी विजय देशमुख, तहसीलदार विजय पाटील, दत्ता अनपट, स्वाती भोईटे, वसंतराव गायकवाड, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पालखीचे स्वागत करण्यात आले.
आजच्या दिवसाचे आकर्षण म्हणजे चांदोबाचा लिंब येथे होणारे उभे रिंगण परिसरात पोलिसांनी चांगला बंदोबस्त लावला होता़ आजूबाजूच्या गावातील लोक मिळेल त्या वाहनाने हरीचा खेळ पाहण्यासाठी आले होते़ माऊलींची पालखी येण्यापूर्वीच रिमझिम पावसाने सडा टाकला होता़ त्यावर राजश्री जुन्नरकर तसेच पुण्याच्या समर्थ रंगावलीच्या कलाकारांनी रांगोळ्या काढल्या होत्या़ ३़३० वाजता रिंगणस्थळी अश्व आले़ ४ वाजता माऊलींचा रथ आला़ रामभाऊ चोपदार, उद्धव चोपदार, बाळासाहेब चोपदार, राजाभाऊ चोपदार यांनी कौशल्याने रिंगण लावले. प्रचंड रेटारेटी असल्याने रिंगणाला मर्यादा आल्या होत्या़
पखवाज आणि टाळांचा खणखणाट चालू होता़ मुखातून ज्ञानोबा-तुकारामांचा अखंड जयघोष सुरू होता़ अशा तल्लीन झालेल्या वातावरणात दोन्ही अश्वांना रिंगणात सोडून देताच अश्वांनी वाऱ्याच्या वेगाने दौडण्यास सुरुवात केली़ त्यावेळी अवघा आसमंत ‘माऊली माऊली’च्या आरोळ्यांनी दुमदुमून गेला होता़ मिनिटभराच्या या खेळाने लाखो नेत्र सुखावले़ त्यानंतर आरती करून बाळासाहेब चोपदारांनी दिंडीकऱ्यांना उडीच्या खेळास आमंत्रण दिले़ हरीच्या खेळाने आनंदित झालेल्या दिंड्या-दिंड्यांमध्ये विविध खेळ सुरू झाले़ नाचत-नाचतच हा सोहळा रात्री तरडगावच्या मुक्कामी गेला़ उद्या पालखी फलटण नगरीत मुक्कामी जाणार आहे़


अश्वाच्या धक्क्याने
आरफळकर जखमी
अपुऱ्या जागेत लावलेल्या रिंगणात अश्वांना दौडण्यास पुरेशी जागा नव्हती़ त्यामुळे दौडताना मालक राजाभाऊ आरफळकर यांना अश्वाचा धक्का लागल्याने ते खाली पडले़ त्यांना तातडीने फलटणच्या रुग्णालयात नेण्यात आले; मात्र त्यांची दुखापत गंभीर नसल्याचे सांगण्यात आले़

Web Title: Rainy rains play in the rain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.