सरकारी नोकरीतील प्रवेशाचे वय वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:44 AM2021-08-21T04:44:29+5:302021-08-21T04:44:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : शासकीय नोकरभरती अनेक वर्षे रखडल्याने या सेवेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा ओलांडून गेली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : शासकीय नोकरभरती अनेक वर्षे रखडल्याने या सेवेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा ओलांडून गेली आहे. त्यामुळे राज्य शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन शासकीय नोकरीत प्रवेशाचे वय तीन ते चार वर्षांनी वाढवावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.
टीईटी, एमपीएससी, यूपीएससी व इतर स्पर्धा परीक्षा शासनाने वेळोवेळी रद्द केल्याने त्या गेली तीन ते चार वर्षे झाल्या नसल्याने परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांना वयाच्या पात्रतेच्या अटीमध्ये चार वर्षांनी वाढ करणे अत्यंत गरजेचे आहे.
राज्यातील विविध क्षेत्रांमधील भरती प्रक्रिया ही कोविड-१९ तसेच वेळोवेळी आलेल्या नैसर्गिक आपत्ती तसेच मराठा आरक्षणाच्या प्रश्नामुळे सातत्याने वेळोवेळी रद्द करण्यात आल्याने राज्यातील सर्व समाज घटकातील सुशिक्षित तसेच उच्च शिक्षित बेरोजगार विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय झालेला आहे. त्यांच्यातील काही अपात्र झाल्याने, कायमस्वरूपी वंचित झाल्याने त्यांच्यावर कायम बेरोजगारीची वेळ आली आहे, याचा विचार शासनाने तातडीने करावा, अशी मागणी करण्यात येते.
तसेच विशेष करून शिक्षक भरतीत आणि अधिकारी स्तरावरील एमपीएससी, यूपीएससी व तत्सम स्पर्धा परीक्षा या गेली तीन ते चार वर्षे सतत वरील कारणाने रद्द किंवा पुढे ढकलल्याने सर्वच समाज घटकातील सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थी या स्पर्धेपासून वंचित राहिल्याने त्यांना या स्पर्धा परीक्षेस बसण्यासाठी किंवा पात्र होण्यासाठी विविध घटकातील विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळी वयोमर्यादेची अट घातलेली असल्याने अनेक विद्यार्थी आता या स्पर्धा परीक्षेपासून वंचित झाल्याने त्यांच्यावर फार मोठा अन्याय होऊ शकतो.
या स्पर्धा परीक्षेस बसण्यासाठी पालकांनी विद्यार्थ्यांना मोठमोठ्या शहरांमध्ये क्लाससाठी व राहण्यासाठी मोठा खर्च हा काहींना कर्जाचा डोंगर उभारून करावा लागत असल्याने फार मोठा आर्थिक फटका बसल्याने त्यांचे आर्थिक कंबरडेच मोडले आहे याचाही विचार व्हावा, अशी मागणी होत आहे.
या मागण्यांचे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, जिल्हा उपाध्यक्ष गणेश कारंडे, विद्वत सभा जिल्हाध्यक्ष आदिनाथ बिराजे, जिल्हा सचिव सुधाकर काकडे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे.