सेंद्रिय शेतीसाठी लोकचळवळ उभारा
By admin | Published: October 9, 2016 12:18 AM2016-10-09T00:18:41+5:302016-10-09T00:43:36+5:30
सदाभाऊ खोत : दुष्काळी भागात केलेले काम कौतुकास्पद
दहिवडी : ‘पांढरवाडी, गोडसेवाडी, दिवडी, कोळेवाडी या चारही गावांनी एकत्र येऊन मोठे जलसंधारणाचे काम केले आहे. हे काम लोकचळवळीमुळे साध्य झाले आहे. या एकीचा उपयोग सेंद्रिय शेतीसाठी करा,’ असे प्रतिपादन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.
पांढरवाडी, गोडसेवाडी, कोळेवाडी, दिवडी या गावांत जलयुक्तमधून झालेल्या कामाची पाहणी व शेतकऱ्यांशी संवाद कार्यक्रमामध्ये सेवासूर्य आश्रम, जाधववाडी येथे ते बोलत होते.
यावेळी माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जिल्हा कृषी अधीक्षक जितेंद्र शिंदे, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार सुरेखा माने, विभागीय कृषी अधिकारी धुमाळ उपस्थित होते.
मंत्री खोत म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या कामाचे मोल त्यांना मिळावे, यासाठी शासन प्रयत्न करत आहे. शेतीमाल गटाने पिकवा, सेंद्रिय शेतीचा प्रयोग केल्यास खर्च कमी होणार असून, शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळतील.’
डॉ. येळगावकर यांनी पांढरवाडीसह चार गावाला कन्हेरचे पाणी कृष्णा नदीतून कॅनॉलने मिळावे, या योजनेत या गावांचा समावेश करावा, अशी मागणी केली. यावेळी गावच्या वतीने जलसंधारणमधून केलेल्या कामाची माहिती देण्यात आली. यानंतर खोत यांनी या कामाची पाहणी केली. ५० एकरांमध्ये उभारलेल्या वनराईची पाहणी केली व लोकचळवळीचे आणि शासकीय विभागाचे कौतुक केले. माण-खटावचे प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)