...म्हणून मोदी चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर टाकले, राज ठाकरेंची कोपरखळी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 09:20 PM2019-04-17T21:20:59+5:302019-04-17T21:22:43+5:30
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या दणक्यामुळे लांबणीवर पडलेल्या मोदी चित्रपटाचीही खिल्ली उडवली
सातारा - मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज सातारा येथे झालेल्या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या धोरणांवर जोरदार टीका केली. यावेळी राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या दणक्यामुळे लांबणीवर पडलेल्या मोदी चित्रपटाचीही खिल्ली उडवली. ''निवडणूक आयुक्तांनी आदेश दिल्यामुळे चित्रपटाचे प्रदर्शन टाळले म्हणे. खरंतर हा चित्रपट पाहायला कुणीच आले नसते. म्हणून या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर टाकले.''असे राज ठाकरे म्हणाले.
''मोदींची एकंदरीत धोरणे हिटलरशी मिळतीजुळती आहेत. हिटलरप्रमाणे मोदींही आपला अजेंडा राबवणारे चित्रपट आणत आहेत. आता त्या मोदी चित्रपटाचे प्रदर्शन निवडणूक आयुक्तांनी सांगितल्यामुळे पुढे ढकलले. तेही यांचेच. खरंतर हा चित्रपट बघायला कुणी आले नसते. त्यामुळेच या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर टाकले. बरं एकतर मोदी आणि त्यात मुख्य अभिनेता विवेक ओबेरॉय म्हणजे आनंदीआनंदच.'' असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.
यावेळी पुलवामातील हल्ल्यावरुन राज ठाकरेंनी मोदींवर तोफ डागली. यावेळी त्यांनी मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेलं भाषण स्क्रीनवर दाखवलं. 'सीआरपीएफ, लष्कर, पोलीस सर्वकाही सरकारच्या ताब्यात असताना दहशतवादी सीमा ओलांडतात कसे? त्यांना पैसा येतो कुठून? सर्व यंत्रणा तुमच्या हातात असताना हे सगळं कसं काय होतं?' असे सवाल मोदींनी मुख्यमंत्री असताना उपस्थित केले होते. मोदींचा तोच व्हिडीओ दाखवत आता मोदींनी याच प्रश्नांची उत्तरं देशाला द्यावीत, असं राज ठाकरे म्हणाले.
एअर स्ट्राइकवरुन मोदी राजकारण करतात. पाकिस्तानला धडा शिकवल्याचं म्हणतात. मग पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खान आम्हाला पुन्हा मोदीच पंतप्रधानपदी हवा, असं कसं काय म्हणतो, असा सवाल राज यांनी उपस्थित केला. मोदींच्या सत्ताकाळात सर्वाधिक जवान शहीद झाल्याचा दावा त्यांनी केला. गुजरातचे मुख्यमंत्री असताना पाकिस्तानला लव्ह लेटर लिहिणं बंद करा म्हणणारे, त्यांनी एक मारला तर त्यांचे चार मारा म्हणणारे मोदी पंतप्रधान झाल्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना शपथविधी सोहळ्याला कसे बोलावतात? वाट वाकडी करुन अचानक शरीफ यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना केक भरवायला कसे काय जातात? त्यांच्याकडे बिर्याणी कशी खातात? असे प्रश्न राज यांनी विचारले. मोदी हे सर्व करत असताना शहीद जवानांच्या कुटुंबांना काय वाटलं असेल, असा सवाल राज यांनी उपस्थित केला.