राज गायकवाडला न्यायालयीन कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2015 12:47 AM2015-09-17T00:47:05+5:302015-09-17T00:52:39+5:30
६़५ कोटी गंडविल्याचे प्रकरण : पोलिसांकडून कसून तपास
बिदर : गुंतवणुकीतून मोठा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून कर्नाटकातील भालकी उपविभागातील शेतकऱ्यांना ६़५ कोटी रुपयांना गंडविणारा आरोपी राज गायकवाड यास औराद बाऱ्हाळी तालुका न्यायालयाने मंगळवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे़ पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करीत आहेत़
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील राज गणपतराव गायकवाड याने बीदर जिल्ह्यातील भालकी आणि औराद बाऱ्हाळी तालुक्यातील शेतकऱ्यांना आपण शेळीपालन व्यवसायासाठी मोठे गुंतवणूकदार आहोत, अशी थाप मारुन या व्यवसायात गुंतवणूक केल्यास १४ महिन्यांत ८० टक्के फायद्यासह मुळ रक्कम देण्याचे आमिष दाखविले़ भालकी आणि औराद बाऱ्हाळी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन आपल्या व्यवसायाची माहिती दिली़ अल्प काळात मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होणार असल्याचे पाहून या दोन्ही तालुक्यांतील २०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी मोठी गुंतवणूक केली़
दरम्यान, मुदत संपल्यानंतर काही शेतकऱ्यांनी फायदा आणि मूळ अनामत रक्कम मिळावी म्हणून राज गायकवाड याचा शोध घेण्यास सुरुवात केली़ मात्र तो सापडत नसल्याचे पाहून अखेर या शेतकऱ्यांनी संतपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली़ याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला़ पोलिसांनी गायकवाड याचा शोध घेऊन सांगली येथून अटक केली़ त्यास मंगळवारी तालुका न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता १४ दिवसांची न्यायालयानी कोठडी सुनावण्यात आली आहे़ प्राथमिक चौकशीत या भागातील २०० शेतकऱ्यांना ६़५ कोटीस गायकवाड याने गंडविले असल्याचे निदर्शनास आले आहे़ या प्रकरणाचा कसून तपास सुरु असून आणखीन काही जणांना गंडविल्याचे शेतकरी सांगत आहेत़ त्यामुळे ही रक्कम वाढण्याची शक्यता आहे, असे संतपूर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले़