निरोपाच्या अन् स्वागताच्या तोफा धडाडूनही राजेंचे मौन!

By Admin | Published: January 15, 2017 12:58 AM2017-01-15T00:58:12+5:302017-01-15T00:58:12+5:30

कोणतेच भाष्य नाही : जिल्ह्याच्या राजकारणात जोरदार खलबतं

Raja's silence by the non-violent gun blast! | निरोपाच्या अन् स्वागताच्या तोफा धडाडूनही राजेंचे मौन!

निरोपाच्या अन् स्वागताच्या तोफा धडाडूनही राजेंचे मौन!

googlenewsNext

सातारा : जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार खलबते सुरू आहेत. या खलबतांच्या केंद्रस्थानी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आहेत. अजिंक्यतारा साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर राष्ट्रवादीच्या मेळाव्यात महारथी नेत्यांनी उदयनराजेंविरोधात रान उठवले. तर दुसऱ्याच दिवशी भाजपचे मातब्बर नेते महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी उदयनराजेंना पक्षात घ्यायला उत्सुकता दर्शवली. निरोपाच्या अन् स्वागताच्या तोफा धडाडत असूनही उदयनराजेंनी मात्र मौन बाळगले आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीविरोधात भूमिका घेतल्याने पक्षाच्या उमेदवाराला पराभवाला सामोरे जावे लागल्याची सल जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांनी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याकडे नुकतीच व्यक्त केली होती. शरद पवारांनी देखील शेखर गोरे यांचा पराभव जिव्हारी लागल्याचे स्पष्ट करत ज्यांना राष्ट्रवादीने निवडून आणले ते कार्यकर्ते पक्षाविरोधात काम करत असतील तर त्यांना बाजूला करण्याचे निर्देश दिले.
दुसऱ्याच दिवशी राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी खासदार उदयनराजे भोसले यांचे भाजपमध्ये स्वागतच केले जाईल, असे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे ते वंशज आहेत, तसेच आम्ही त्यांना मुजरा करतो, असे म्हणत उदयनराजेंना भाजपमध्ये घेण्यासाठी उत्सुक असल्याचे बोलून दाखविले होते.
स्वपक्षाचे नेतेमंडळी जाहीरपणे विरोधात भूमिका घेत असताना खासदार उदयनराजेंनी मात्र मौन बाळगले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये सातारा तालुक्यात दोन्ही राजेंचे कार्यकर्ते स्वतंत्रपणे लढायची तयारी करत आहेत. काही ठिकाणी तर बाह्या वर करून एकमेकांची जिरवण्यासाठी सज्ज आहेत. दुसऱ्या बाजूला भाजपही उदयनराजेंना आपल्याकडे खेचून बळ वाढविण्यासाठी तयारीत दिसते. या घडामोडी वेगाने घडत असताना उदयनराजेंकडून काहीच हालचाली नसल्याने कोंडी कायम राहिली आहे. (प्रतिनिधी)
पत्रकयुद्ध का थांबले?
जलमंदिर व सुरुची या दोन वाड्यांवरून एकमेकांविरोधातील पत्रकांची सरबत्ती थांबली आहे. वास्तविक, काही दिवसांपूर्वी विरोधात शब्द निघाला तरी दोन्ही वाड्यांवरून पत्रके प्रसिद्धीसाठी पाठविली जात होती. हे पत्रकयुद्ध माध्यमांतून बरेच गाजले होते. हे युद्ध अचानकपणे कसे थांबले?, असा सवाल साताऱ्यातील जनतेला पडला आहे.

Web Title: Raja's silence by the non-violent gun blast!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.