राजे अन् भाऊंमध्ये गुफ्तगू !

By admin | Published: October 29, 2016 12:23 AM2016-10-29T00:23:01+5:302016-10-29T00:25:14+5:30

पाऊण तास चर्चा : सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्सुकता

Raje and brothers! | राजे अन् भाऊंमध्ये गुफ्तगू !

राजे अन् भाऊंमध्ये गुफ्तगू !

Next

 
दहिवडी : सातारा येथील एका हॉटेलमध्ये सांगली-सातारा विधान परिषद मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार शेखर गोरे हे त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत चर्चा करत असतानाच त्याठिकाणी खासदार उदयनराजे भोसले यांची एन्ट्री झाली. त्यानंतर उदयनराजे आणि शेखर
गोरे हॉटेलच्या वरच्या मजल्यावर गेले व सुमारे पाऊण तास दोघांनी कमराबंद चर्चा केली. त्यावेळी गोरे यांचे शेकडो समर्थक हॉटेल परिसरात थांबले होते.
सांगली-सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आमदार जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर करून काँग्रेसला कोंडीत पकडले आहे. मुंबई येथील पक्ष प्रवेशावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, सुनील तटकरे, नवाब मलिक, दिलीप वळसे-पाटील यांच्यासारख्या दिग्गजांसह जिल्ह्यातील रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार शशिकांत
शिंदे, प्रभाकर घार्गे उपस्थित
होते.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी शेखर गोरे व उदयनराजे भोसले यांच्यातील भेटीला विशेष महत्त्व आले आहे. मुंबईतील प्रवेशावेळीही खासदार उदयनराजे भोसले यांचे नाव घेऊन राष्ट्रवादी पाठीशी असल्याचे सांगितले होते. तर काही दिवसांपूर्वी रामराजे नाईक-निंबाळकर व उदयनराजे भोसले यांच्यात समन्वय झाल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी बंद झाल्या. जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादीने कोणतीही भूमिका घेतली नाही.
उदयनराजे भोसले यांची भूमिका नेहमीच महत्त्वपूर्ण ठरते. जिल्हा बँक निवडणूक असो वा जिल्हा परिषदेच्या शिवाजी शिंदे यांच्याविरुद्धचा अविश्वास ठराव. काँग्रेसने नेहमी राष्ट्रवादीच्या एका गटाला साथ देण्याचे काम केले असून, उदयनराजेंना नेहमी खूश ठेवले होते. असे असले तरी पक्षाला गरज असेल त्यावेळी उदयनराजे भोसले यांनीही ठाम भूमिका घेतली आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत शेखर गोरे उमेदवार असल्याने या चर्चेला महत्त्व आहे.
शेखर गोरे यांनी दुसऱ्याच दिवशी उदयनराजे भोसले यांची भेट घेऊन आपल्या उमेदवारीसाठी भक्कम समर्थन मिळविण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल टाकल्याचे दिसते. सातारा येथील बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असल्याचे शेखर गोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
जिल्ह्यातही त्यांचे समर्थक आहेत. त्यामुळे त्यांच्यातील भेटीला महत्त्व आहे. उदयनराजेंचा होकार यावर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यांची भूमिका लवकरच स्पष्ट करणार आहेत. त्यामुळे उदयनराजे भोसले कोणती भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळातील जाणकरांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
 

Web Title: Raje and brothers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.