नगरपालिकेत राजेंच्या विकास आघाड्या की पक्षांच्या पायघड्या?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:47 AM2021-02-17T04:47:15+5:302021-02-17T04:47:15+5:30
सातारा नगरपालिका निवडणूक आता काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. पालिकेत खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोघांची ...
सातारा
नगरपालिका निवडणूक आता काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. पालिकेत खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोघांची सत्ता. कधी दोघे एकमेकांच्या विरोधात तर कधी मनोमिलनाची परिस्थिती. एकाच पक्षात असून पालिकेत मात्र दोन्ही राजेंच्या स्वतंत्र आघाड्या. यावेळी राजेंबरोबरच जिल्ह्यातून मंत्रिपदावर आरूढ झालेले आणि जिल्ह्याचे नेतृत्व करणारे काहीजण पालिकेच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे यावेळी राजेंच्या विकास आघाड्यांसोबतच मतदारांसाठी पालिकेत पाय कधीही पाय न ठेवलेल्या पक्षांच्याही पायघड्या पडणार आहेत.
शहरातील विकासकामांचे श्रेय आणि न झालेल्या कामांचेही श्रेय दोन्ही राजेंच्या नावावरच पडते. काही प्रकल्पांना दोघांची ताकद लागते आणि प्रकल्प मार्गी लागतो. सातारकरांच्या दृष्टीने ही सर्वांत महत्वाची बाब आहे. प्रकल्प कोणी पूर्ण केला आणि त्याचे श्रेय कोणी घेतले याची लोक काही दिवस चवीने चर्चा करतात आणि पुन्हा विसरून जातात. कधी न केलेल्या कामांचा राग, तर कधी केलेल्या कामांचे समाधान असे मानून प्रत्येक पाच वर्षांनी येणाऱ्या निवडणुकीत राजेंच्या शिलेदारांच्या गळ्यातच नगरसेवकाची माळ घालतात. ते मेहरबान झाले की मग वॉर्डातील विकासकामांचा सूर लागतो. अन्यथा कधी-कधी त्यांची पाच वर्षे कशी निघून गेली, हे त्यांचे त्यांनाही कळत नाही.
राजे आणि शिलेदारांच्या या मेळ्यात आता राजकीय पक्षही उतरण्याच्या तयारीत आहेत. शिवसेनेने तशी डरकाळी फोडली आहे. पण, त्याच ताकदीने त्यांनी पालिकेची निवडणूक लढविण्याचीदेखील आवश्यकता आहे. गर्जेल तो बरसेल का असे व्हायला नको. शिवसेनेची ताकद शहरात कमी असली तरी त्यांनी प्रत्येक वॉर्डात आपला उमेदवार उभा करणे आवश्यक आहे. आता नगरपालिकेची हद्दवाढ झालेली असल्याने त्यांनाही मोठी संधी आहे. भाजपने आपले संख्याबळ वाढविण्याची आवश्यकता आहे. दोन्ही राजेंनी भाजपच्या माध्यमातून निवडणूक लढविली तर भाजपच्या विद्यमान सदस्यांना सामावून घेता येईल. आघाड्यांच्या माध्यमातून निवडणूक लढली गेली तर पुन्हा भाजपचे नगरसेवक एकटे पडण्याची शक्यता आहे. त्यांना विकास आघाडीमध्ये जाता येणार नाही आणि पक्षाकडे नेते असूनही भाजपकडून निवडून येता येणार नाही, अशी त्यांची गोची होण्याची शक्यता आहे.
भाजप, शिवसेनेसोबतच आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही नगरपालिकेच्या निवडणुकीत उडी घेण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ही आत्तापर्यंत दोन्ही राजेंच्या अवतीभवतीच होती. त्यामुळे शहरात पक्ष म्हणून त्यांचे असे अस्तित्व जाणवण्याइतपत नाही. शिवेंद्रसिंहराजे भोसले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले तरच त्यांना ही निवडणूक सोपी होऊ शकते, याची जाणीव असल्यामुळेच शशिकांत शिंदे यांनी सोमवारी (दि. १५) खडा टाकून पाहिले आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले हे नगरपालिका निवडणुकीअगोदर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले तर तेच पालिकेत राष्ट्रवादीचे नेतृत्व करतील अन्यथा शशिकांत शिंदे आणि दीपक पवार यांच्या ताकदीवर राष्ट्रवादीला निवडणूक लढवावी लागणार आहे. गेली अनेक वर्षे शिवेंद्रसिंहराजे भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच असल्यामुळे राष्ट्रवादीला पालिकेसाठी ताकद लावावी लागली नाही. त्याबरोबरच पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागली नाही. स्थानिक आघाड्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीने नेहमीच्या कार्यशैलीप्रमाणे संधान साधून निवडणुका लढविल्या आहेत. यावेळी पहिल्यांदाच त्यांना पालिकेत पक्षाच्या चिन्हावर आणि प्रत्येक वॉर्डात लोक शोधून उमेदवारी द्यावी लागणार आहे.
भाजपचे नगरसेवक शिवेंद्रराजेंसोबत का उदयनराजेंसोबत?
नगरपालिका निवडणुकीत शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि उदयनराजे भोसले यांना मानणारे नगरसेवक आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते कोणत्या आघाडीत जातात, की पक्षाच्या चिन्हावरच निवडणूक लढवितात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. भाजपच्या नगरसेवकांचा दोन्ही राजेंकडे राबता असल्यामुळे जिकडे संधी मिळेल तिकडे किंवा नाहीच मिळाली तर पक्ष संधी देईल तिकडे असेच नियोजन त्यांना करावे लागणार आहे.
सेना, भाजप, राष्ट्रवादीच्या स्पर्धेत काँग्रेस रिंगणाबाहेरच
नगरपालिका निवडणुकीत कोण कुठे असणार आणि कोण मैदानात उतरणार याची तयारी आत्तापासूनच सुरू झाली आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन प्रमुख पक्षांबरोबरच इतर पक्षही पालिकेच्या मैदानात उतरणार असले तरी काँग्रेसची नेमकी भूमिका काय असणार, याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह आहे. त्यांनी आपली भूमिका जाहीर केलेली नसल्यामुळे ते शिवसेनेसोबत जाणार, की राष्ट्रवादी सोबत राहणार, की स्वतंत्रपणे निवडणुकीत उतरणार हे पाहणेदेखील औत्सुक्याचे ठरणार आहे.