मराठ्यांच्या राजधानीत राजमुद्रेचा दंडक गायब
By admin | Published: February 25, 2015 09:09 PM2015-02-25T21:09:30+5:302015-02-26T00:18:13+5:30
कमानी हौद : इतिहासप्रेमींमध्ये नाराजी; दंडक पूर्ववत करण्याची मागणी
सचिन काकडे -सातारा -- मराठ्यांची राजधानी म्हणून अभिमानाने सर्वत्र मिरविणाऱ्या साताऱ्यात राजमुद्रेचा दंडक गायब झाला आहे. शहरातील ऐतिहासिक कमानी हौदातील भिंतीवर कोरण्यात आलेल्या शिवकालीन षटकोनी राजमुद्रेशेजारी चार दंडक असून, यापैकी एक दंडक अनेक वर्षांपासून गायब आहे. यामुळे इतिहासपे्रमींमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
कमानी हौदाला ऐतिहासिक महत्त्व आहे. याला सतरा कमानींचा हौद म्हणूनही संबोधले जाते. एकेकाळी हत्तींना पाणी पिण्यासाठी याठिकाणी आणले जात असे. या कमानी हौदाच्या देखभालीची जबाबदारी सध्या पालिका प्रशासनाकडे आहे.
या हौदाचे जेव्हा सुशोभीकरण करण्यात आले, तेव्हा हौदाच्या मधोमध असणाऱ्या भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारी षटकोनी आकारातील राजमुद्रा कोरण्यात आली. राजमुद्रेशेजारी चार दंडक ही कोरण्यात आले. मात्र, यामधील एक दंडक गेल्या अनेक वर्षांपासून गायब झाला आहे. त्यामुळे राजमुद्रेची शोभा कमी झाल्याचे दिसून येत आहे.
पालिका प्रशासनाकडून गेल्या वर्षी कमानी हौदाला रंगरंगोटीचे काम करण्यात आले. याच्या सुरक्षेची देखील पुरेपूर काळजी घेऊन संपूर्ण हौद लोखंडी रेलिंगने बंदिस्त
करण्यात आला. मात्र राजमुद्रेशेजारील दंडकाचा सर्वांनाच विसर पडलेला दिसून येत आहे.
राजमुद्रेशेजारील एका दंडकाचे काय झाले? हे कोणालाच माहीत नाही. मात्र, याच्या दुरुस्तीकडेही कोणाचे लक्ष गेले नाही. यामुळे राजमुद्रेची शोभा वाढविण्यासाठी दंडक पूर्ववत करावा, अशी मागणी होत आहे.
कमानी हौदाचे सुशोभीकरण केल्यानंतर या परिसराचे सौंदर्य वाढले. हौदाच्या भिंतीवर असणाऱ्या राजमुद्रेचा दंडक नसल्याचे लक्षात आल्यानंतर पालिका प्रशासनाला तशा सूचना केल्या आहेत. दंडक लवकरात लवकर बसविण्याची व्यवस्था करण्यात येईल.
- सुजाता राजेमहाडिक, नगरसेविका
बाह्य सुरक्षा रामभरोसे
पालिकेच्या वतीने कमानी हौदाच्या सुशोभीकरणाचे काम करण्यात आले आहे. मात्र नागरिकांचे मुख्य आकर्षण असणारा येथील कारंजा नेहमीच बंद अवस्थेत असतो. लोखंडी रेलिंग बसविल्यामुळे या हौदाची अंतर्गत सुरक्षा जरी मजबुत झाली असली तरी बाह्य सुरक्षेचा प्रश्न मात्र जैसे थे आहे. याठिकाणी देखरेख करण्यासाठी कर्मचारी नसल्यामुळे भटक्या जनावरांची या ठिकाणी सतत वर्दळ असते. याबरोबरच रात्रीच्यावेळी मद्यपीं देखील याठिकाणी ठाण मांडून बसतात. याबाबत पालिकेने ठोस पावले उचलावित असे नागरिकांचे म्हणने आहे.