राजेंचे मनोमिलन; कार्यकर्त्यांना रुचेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 11:11 PM2019-04-24T23:11:38+5:302019-04-24T23:11:44+5:30

सातारा : लोकसभा निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात झालेले मनोमिलन दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना रुचले नसल्याचेच चित्र ...

Rajne's mindset; Workers are interested! | राजेंचे मनोमिलन; कार्यकर्त्यांना रुचेना!

राजेंचे मनोमिलन; कार्यकर्त्यांना रुचेना!

Next

सातारा : लोकसभा निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात झालेले मनोमिलन दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना रुचले नसल्याचेच चित्र पाहायला मिळाले. मनोमिलनाच्या आणाभाका घेऊन देखील शहरामध्ये दोन्ही आघाड्यांची संघटित शक्ती पाहायला मिळाली नाही.
उदयनराजेंच्या लोकसभा उमेदवारीला शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केला होता. मुंबईत झालेल्या पक्षाच्या बैठकीत कार्यकर्ते आक्रमक झाले होते. सातारा शहरातील कार्यकर्त्यांनी तसेच ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी स्वतंत्र बैठक घेऊन उदयनराजे भोसले यांच्या नावाला विरोध केला होता. तरीही उदयनराजेंनाच उमेदवारी दिली गेली. यानंतर फेरमनोमिलनाचा मेळावा झाला. या मेळाव्याला दोन्ही आघाड्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर सर्वजण एकत्रितपणे कामाला लागतील, अशी शक्यता होती. मात्र, तसे झाले नाही. शहरातील नगरविकास आघाडीच्या ठराविक कार्यकर्त्यांनीच प्रचारात सहभाग घेतला.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मात्र सातारा शहरासह ग्रामीण भागात उदयनराजेंसाठी लोकांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेतल्या. शहरात काढलेल्या प्रचारफेऱ्यांत त्यांच्यासोबत सातारा विकास आघाडीचे सदस्यच पाहायला मिळाले. मात्र, नगरविकास आघाडीची मंडळी अलिप्त राहिल्याचे चित्र होते. तालुक्यात विविध ठिकाणी झालेल्या सभांमध्ये शिवेंद्रसिंहराजेंनी भाजप सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली.
ग्रामीण भागातूनही उदयनराजेंना मताधिक्य देण्याबाबत जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत सरपंच तसेच सदस्यांना शिवेंद्रसिंहराजेंनी सूचना केल्या होत्या. जिल्हा परिषदेचे ५ गट तर ११ गण शिवेंद्रसिंहराजे यांच्या ताब्यात आहेत. ३ गट ७ गण उदयनराजे यांच्या ताब्यात आहेत. ग्रामीण भागातून राष्ट्रवादीसाठी कार्यकर्ते फिरले.
वर्णे गटातील भाजपचे सदस्य मनोज घोरपडे हे कºहाड उत्तर विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा तयारी करत आहेत. लोकसभा निवडणुकीत युतीच्या नरेंद्र पाटील यांना आपल्या भागातून मतांची आघाडी देण्याचे प्रयत्न त्यांनी केले. दोन्ही राजेंनी पूवी्रचे वाद विसरून एकत्रित काम करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर उदयनराजेंच्या प्रचारासाठी दोन्ही आघाड्यांची संघटित शक्ती दिसायला हवी होती. मात्र तशी दिसली नाही. शहरात मतदान प्रक्रिया सुरू असतानाही साविआचे बरेच नगरसेवक हातचा राखून काम करताना दिसले.

वनवासवाडीतून उदयनराजेंचा प्रचार
खासदार उदयनराजे भोसले यांचे नेतृत्व मानणारे माजी जिल्हा परिषदेचे सदस्य संदीप शिंदे यांनी मागील जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचा झेंडा हाती घेतला होता. त्यांच्या पत्नी रेश्मा शिंदे वनवासवाडी गटातून भाजपच्या चिन्हावर जिल्हा परिषदेत निवडून गेल्या आहेत. संदीप शिंदे हे उदयनराजे भोसले यांच्या प्रचारात उतरलेले पाहायला मिळाले.

Web Title: Rajne's mindset; Workers are interested!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.