उपनगराध्यक्षपदी राजू भोसले
By Admin | Published: December 28, 2016 12:49 AM2016-12-28T00:49:36+5:302016-12-28T00:49:36+5:30
चारजण स्वीकृत नगरसेवक : शिवेंद्रसिंहराजेंच्या आघडीतून अतुल चव्हाण यांना संधी
सातारा : साताऱ्याच्या उपनगराध्यक्षपदासाठी नगरसेवक राजू भोसले यांची निवड झाली असून मंगळवारी दुपारी खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत त्यांनी पदभार स्वीकारला. तसेच सातारा विकास आघाडीकडून अॅड. दत्ता बनकर, धनश्री महाडिक तर आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या आघाडीतील अतुल चव्हाण आणि भाजपकडून अॅड. प्रशांत खामकर यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाली.
नगराध्यक्षा माधवी कदम यांनी उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी मंगळवारी (दि. २७) विशेष सभा बोलावली होती. सकाळी नामनिर्देशनपत्रे दाखल करून घेतली गेली. या निवडणुकीत नगरविकास आघाडीही उडी घेईल, अशी शक्यता होती; परंतु ‘नविआ’ ने उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे उपनगराध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाली. खासदार उदयनराजे भोसले यांनी नगरसेवक राजू भोसले यांचे नाव उपनगराध्यक्षपदासाठी निश्चित केल्याचे वृत्त ‘लोकमत’ने मंगळवारी प्रसिद्ध केले होते. ते अखेर खरे ठरले.
खासदार उदयनराजे भोसले यांनी निवडीवेळी उपस्थित राहून सर्व नगरसेवक आणि स्वीकृत नगरसेवकांचा सत्कार केला. विरोधी पक्षनेते म्हणून नगर विकास आघाडीचे अशोक मोने यांची निवड करण्यात आली. (प्रतिनिधी)
‘नविआ’त चव्हाण यांना संधी !
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नगर विकास आघाडीतील अविनाश कदम, जयेंद्र चव्हाण यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिली जाण्याची चर्चा होती.मात्र सातारच्या राजकारणात फारसे चर्चेत नसलेले अतुल चव्हाण यांच्या नावावर आघाडीकडून शिक्कामोर्तब झाले. शिवेंद्रसिंराजेंच्या आघाडीतील काही अनुभवी नगरसेवकच पालिकेत नसल्याने सभागृहात आघाडीची भूमिका मांडण्याची जबाबदारी आता नगरसेवक अशोक मोने यांच्यावर आली आहे.
‘लोकमत’चे वृत्त खरे ठरले
गेल्या काही दिवसांपासून सातारा पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार, यावर चर्चा होत होती. मात्र मंगळवारी ‘लोकमत’ने उपनगराध्यक्षांच्या नावासह स्वीकृत नगरसेवकांचीही नावे जाहीर केली होती. त्याच नावावर अखेर शिक्कामोर्तब झाल्याने ‘लोकमत’चे वृत्त खरे ठरले. त्यामुळे अनेकांनी ‘लोकमत’ला धन्यवाद दिले.