'स्वाभिमानी'चे राजू शेळके एजंट, बिनविरोध निवडणुकीसाठी संपर्क केलेला - विक्रम पवार
By नितीन काळेल | Published: April 28, 2023 07:22 PM2023-04-28T19:22:35+5:302023-04-28T19:22:57+5:30
एजंटगिरीशिवाय त्यांनी काही केले नाही
सातारा : ‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेळके हे १०० टक्के एजंट आहेत. एजंटगिरीशिवाय त्यांनी कोणताही धंदा केला नाही. बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी किती रुपये देणार, असा निरोप त्यांनी दिला होता,’ असा दावा माजी सभापती विक्रम पवार यांनी केला आहे. सातारा येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना पवार यांनी सातारा बाजार समिती निवडणुकीच्या अनुषंगाने विरोधी स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर जोरदार टीकास्त्र सोडले.
विक्रम पवार म्हणाले, ‘सातारा बाजार समितीची निवडणूक होत आहे. यासाठी आमचे सत्ताधारी गटाचे अजिंक्यतारा पॅनेल उभे आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेळके यांनी विक्रम पवार यांनी मोठ्या प्रमाणात पापं केल्याची टीका केली आहे. पण, मी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढून साडेसतरा एकर जमीन मिळविली. ही जागा बाजार समितीच्या नावावर करून विक्रम केलाय. राजू शेळके हे तर १०० टक्के एजंट माणूस आहे. त्यांच्याबाबत माहिती घेतल्यास बरेच काही लक्षात येईल.
बाजार समिती निवडणुकीपूर्वी शेळके यांनी कोणामार्फत तरी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी निरोप दिला होता. चर्चा केली होती, असे सांगून विक्रम पवार पुढे म्हणाले, ‘सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. शेतकऱी बसतात तेथे पेव्हर ब्लाॅक, महिलांसाठी शाैचालय, ग्रामीण भागातील मुलांसाठी अभ्यासिका सुरू केली आहे.
अनेकांच्या पोटात दुखत आहे...
अनेक लोकांच्या पोटात दुखत आहे. दुसऱ्याच्या पोटात आहे तेच राजू शेळके यांच्या ओठातून बाहेर पडले आहे. पण, आताच्या निवडणुकीत त्यांची कपबशी फुटणार आहे. कारण, आम्ही चांगलं काम केलं हेच मतदानानंतर दिसून येईल, असा दावाही विक्रम पवार यांनी केला आहे.