मी तांडव करणारा शंकर, गांधी मैदानात या; राजू शेळके यांचे आव्हान,अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार

By नितीन काळेल | Published: April 28, 2023 07:28 PM2023-04-28T19:28:50+5:302023-04-28T19:29:36+5:30

सत्ताधाऱ्यांनी दडपशाही आणि हुकुमशाही राबवली

Raju Shelke, district president of Swabhimani Farmers Association warned Vikram Pawar the former president | मी तांडव करणारा शंकर, गांधी मैदानात या; राजू शेळके यांचे आव्हान,अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार

मी तांडव करणारा शंकर, गांधी मैदानात या; राजू शेळके यांचे आव्हान,अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार

googlenewsNext

सातारा : ‘बाजार समितीमुळे बाजारबुनग्यांनी आरोप केलेत. त्यांनी कागदपत्रे घेऊन गांधी मैदानात यावं. बेछुट आरोप न करता पुराव्यानिशी ते सिध्द करावे. नाहीतर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे. मी भोळा नव्हे, तर तांडव करणारा शंकर आहे,’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी दिला आहे.

सातारा येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना राजू शेळके यांनी बाजार समितीचे माजी सभापती विक्रम पवार यांना हा इशारा दिला. पवार यांनी शेळकेंवर निवडणूक बिनविरोधसाठी पैशाची मागणी केल्याचे म्हटले होते. त्यामुळे शेळके यांनी याचा चांगलाच समाचार घेतला.

राजू शेळके म्हणाले, ‘सातारा बाजार समितीची निवडणूक ही एेतिहासिक होणार आहे. आम्ही चळवळीत आयुष्य वाहून घेतलंय. अंगावर आमच्या सोन्याची एक तारही दिसणार नाही. आमच्यावर बाजारबुनगे आरोप करतात. पण, मी विकणारा शंकर नाही, मी तांडव करतो. माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी कायद्याची खरेच पदवी घेतली आहे का ? अशी शंका येते. मी त्यांना माफी देणार नाही. त्यांनी आरोप सिध्द करावा. कारण, त्यांना दलालीची सवय लागली आहे. त्यातून स्वत:चं उखळ पांढरं करत आहेत. त्यांच्याविरोधात न्यायालयात अनेक केसेस आहेत. शेतकऱ्यांची चळवळ त्यांनी बदनाम करण्याचा प्रयत्न केलाय. आता मोठा उठाव झाला असून जनताच मतदानातून उत्तर देईल. कारण, आता सर्जीकल स्ट्राईकच होणार आहे.

बाजार समितीतील तुम्ही सत्ताधारी आहात. तुम्ही लोकांना उत्तर देण्यास बांधिल आहात. तर आम्ही जनतेशी बांधिल आहोत. आरोप सिध्द करण्यासाठी गांधी मैदानात यावे, असे आव्हानही राजू शेळके यांनी दिले आहे.

भ्रष्टाचाऱ्यांना गाडणार...

साताऱ्यात स्वाभिमानीचा निवडणुकीसंदर्भात मेळावा झाला. यामध्येही राजू शेळके यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले. सत्ताधाऱ्यांनी दडपशाही आणि हुकुमशाही राबवली. अनेक संस्थांत भ्रष्टाचार केला. या निवडणुकीत भ्रष्टाचाऱ्यांना गाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही दिला आहे.

Web Title: Raju Shelke, district president of Swabhimani Farmers Association warned Vikram Pawar the former president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.