राजवाडा चौपाटी बंद होऊ देणार नाही : हॉकर्स संघटनेची भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 11:25 PM2019-01-21T23:25:46+5:302019-01-21T23:29:06+5:30
सातारा : ‘राजवाडा चौपाटीवर आम्ही गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून व्यवसाय करीत आहोत. जोपर्यंत खासदार उदयनराजे भोसले स्वत: सांगत ...
सातारा : ‘राजवाडा चौपाटीवर आम्ही गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून व्यवसाय करीत आहोत. जोपर्यंत खासदार उदयनराजे भोसले स्वत: सांगत नाहीत, तोपर्यंत आम्ही इंचभरही जागा सोडणार नाही. मात्र राजवाडा चौपाटी बंद होऊ देणार नाही, अशी भूमिका हॉकर्स संघटनेनी घेतली आहे. दरम्यान, चौपाटी हटविण्याची मागणी करणाºयांचा निषेध व्यक्त करून उपोषणाला उपोषणानेच उत्तर दिले जाईल, असा इशाराही देण्यात आला.
शहरात एकीकडे अतिक्रमण वाढत असताना ऐतिहासिक महत्त्व लाभलेला राजवाडा चौपाटीमुळे झाकोळला जात आहे. शासनाच्या नियमानुसार राजवाडा ही ऐतिहासिक वास्तू आहे. या वास्तूच्या पाचशे मीटर अंतरापर्यंत ज्वलनशील पदार्थ व टपºया टाकता येत नाही. त्यामुळे या ऐतिहासिक वास्तूचे जतन व संरक्षण व्हावे, यासाठी गांधी मैदानावरील सर्व हातगाड्या हटविण्यात याव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे. याबाबत तातडीने निर्णय न झाल्यास उपोषणास बसणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, सुशांत मोरे यांच्या या मागणीचा आयटक संलग्न सर्वधर्मीय सुशिक्षित बेरोजगार हॉकर्स संघटनेच्या वतीने कडाडून निषेध करण्यात आला. येथील सुमारे शंभर हातगाडीधारकांनी सोमवारी सकाळी गांधी मैदानावर आंदोलन केले. तसेच आपल्या मागण्यांच्या निवेदन मुख्याधिकारी शंकर गोरे यांना दिले. जोपर्यंत पालिकेच्या वतीने हातगाडीधारकांना बायोमेट्रिक सर्व्हे करून हॉकर्स झोन निश्चित केला जात नाही, तोपर्यंत आम्ही आहे त्या ठिकाणावरच आपला व्यवसाय करणार आहोत. याला जर कोणी विरोध केला तर सर्व हातगाडीधारक उपोषणाला उपोषणानेच उत्तर देतील, असे निवेदनात नमूद केले आहे.
नगरपालिकेच्या मुख्याधिकाºयांना दिलेल्या निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण निकम, शहराध्यक्ष संजय पवार, सेक्रेटरी कॉ. शामराव चिंचणे, शिवाजीराव निकम, राजा राजपुरे, सागर गोसावी, रोहित जगताप, नानासाहबे मांढरे, रवी घाडगे, संदीप पवार, नरेश जांभळे, बबलू शर्मा यांच्यासह संघटनेतील सदस्यांच्या सह्या आहेत.
संघटनेत फूट नाही
हॉकर्स संघटनेमध्ये फूट पडल्याच्या वावड्या सर्वत्र उठविल्या जात आहेत. परंतु यामध्ये कोणतेही तथ्य नाही. संघटना आपल्या न्याय हक्कांसाठी वेळोवेळी सक्षमपणे व एकजुटीने लढत आहे. याचा प्रत्यय अनेकदा आला आहे. हातगाडीधारकांना सर्व्हे व जागा निश्चित होण्यापूर्वीच जर कोणी चौपाटी हटविण्याची मागणी करीत असेल आम्ही शांत बसणार नाही. न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही आमचा व्यवसाय सुरू ठेवणार आहे, अशी माहिती संघटनेचे शहराध्यक्ष संजय पवार यांनी दिली.