महागाईविरोधात राष्ट्रवादीचा फलटणमध्ये मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 04:13 PM2017-10-12T16:13:27+5:302017-10-12T16:23:33+5:30
फलटणमध्ये वाढत्या महागाईच्या विरोधात फलटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुरुवारी तहसील कार्यालयावर एल्गार मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेकडो कार्यकर्ते, शेतकरी सहभागी झाले होते.
फलटण, दि. १२ : वाढत्या महागाईच्या विरोधात फलटणमध्ये राष्ट्रवादीतर्फे मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेकडो कार्यकर्ते, शेतकरी सहभागी झाले होते. फलटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुरुवारी श्रीराम मंदिर येथून तहसील कार्यालयावर एल्गार मोर्चा काढण्यात आला.
वाढती महागाई, फसवी कर्जमाफी, स्वयंपाकाचा गैस, पेट्रोल, डिझेल दरवाढ, जीएसटी, प्रचंड करवाढ, बंद पडत असलेले उद्योग, कामगार विरोधी धोरण, शेती मालाचे ढासळते दर, सहकार विरोधी भूमिका, भरमसाठ वीजबिल आणि भारनियमन यामुळे शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, महिला, विद्यार्थी आदी समाजातील विविध घटकांच्या प्रश्नांसाठी या एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
मोर्चामध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, माजी आमदार डॉ. कृष्णचंद्र भोइटे, पंचायत समितीच्या सभापती रेश्मा भोसले, नगराध्यक्षा नीता नेवसे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विलासराव नलवडे, शहराध्यक्ष मिलिंद नेवसे, पंचायत समिती सदस्य विश्वजितराजे नाईक-निंबाळकर सहभागी झाले होते.
मोर्चात बैलगाड्या घेऊन शेतकरी सहभागी झाले होते. स्वयंपाकाचा गॅस महागल्याने चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तहसील कार्यालयाबाहेर महिलांनी चुलीवर स्वयंपाक केला. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार विजय पाटील यांना देण्यात आले.