साताऱ्यात निंबाळकर, चव्हाण, भोसले घराण्यांचे वर्चस्व

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 06:17 PM2024-10-28T18:17:16+5:302024-10-28T18:20:17+5:30

नितीन काळेल सातारा : सातारा जिल्ह्यानेच राज्याला चार मुख्यमंत्री दिले आहेत. असा इतिहास लाभलेल्या सातारा जिल्ह्यात आजही अनेक घराणी ...

Ram Raje Naik-Nimbalkar, Prithviraj Chavan, Shivendra Singh Raje Bhosle families dominated in Satara | साताऱ्यात निंबाळकर, चव्हाण, भोसले घराण्यांचे वर्चस्व

साताऱ्यात निंबाळकर, चव्हाण, भोसले घराण्यांचे वर्चस्व

नितीन काळेल

सातारा : सातारा जिल्ह्यानेच राज्याला चार मुख्यमंत्री दिले आहेत. असा इतिहास लाभलेल्या सातारा जिल्ह्यात आजही अनेक घराणी राजकारणात दबदबा टिकवून आहेत. त्यामुळे संबंधित घराण्यातील व्यक्तींनी आमदार, खासदार ते मुख्यमंत्रिपदापर्यंतचा टप्पा गाठलेला आहे.

फलटणचे मालोजीराजे नाईक-निंबाळकर यांचा १९४९ मध्ये बाळासाहेब खेर यांच्या मंत्रिमंडळात समावेश झाला हाेता. १९५२ला मुंबई प्रांतिक विधानसभेवर निवडून गेले. १९५२ ते ५७ दरम्यान ते मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. त्यानंतर त्यांचे चिरंजीव शिवाजीराजे नाईक-निंबाळकर हे आमदार झाले होते तर मालोजीराजे यांचे नातू आणि शिवाजीराजे यांचे पुतणे रामराजे नाईक-निंबाळकर हे १९९५ला फलटण मतदारसंघातून प्रथम आमदार झाले. त्यानंतर राष्ट्रवादीकडून १९९९ आणि २००४ची निवडणूकही लढवून आमदार झाले. रामराजे मंत्रीही होते. तसेच राज्य विधानपरिषेदेचे सभापती होते. सध्या विधान परिषदेचे आमदार आहेत.

आनंदराव चव्हाण कऱ्हाड लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात असताना खासदार होते. केंद्रात मंत्रीही राहिले. त्यांच्या पत्नी प्रेमलाकाकी चव्हाण याही कऱ्हाडच्या खासदार राहिल्या तर चव्हाण यांचे पुत्र पृथ्वीराज चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री झाले. आता ते आमदार आहेत.

पाटणचे बाळासाहेब देसाई हे राज्याचे गृहमंत्री राहिले. त्यांचा मुलगा शिवाजीराव देसाई हेही राजकारणात होते. आता बाळासाहेब देसाई यांचे नातू शंभूराज देसाई पाटणचे आमदार तसेच राज्यात उत्पादन शुल्क मंत्रीही आहेत.

सातारचे अभयसिंहराजे भोसले हे सातारा विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत होते. ते सहकार मंत्रीही झाले. आता त्यांचा मुलगा शिवेंद्रसिंहराजे भोसले आमदार आहेत.

वाईचे दिवंगत लक्ष्मणराव पाटील राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार झाले. त्यांचा मुलगा मकरंद पाटील वाईचे आमदार आहेत तर दुसरा मुलगा नितीन पाटील राज्यसभेचे खासदार आहेत.

वाईचे दिवंगत प्रतापराव भोसले हे वाईचे आमदार, राज्यात मंत्री तसेच सातारचे खासदार होते. त्यांचा मुलगा मदन भोसले वाईचे आमदार होते. फलटणचे हिंदुराव नाईक-निंबाळकर हे सातारा लोकसभा मतदारसंघाचे १९९६ साली खासदार झाले. तर त्यांचा मुलगा २०१९ मध्ये माढा लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले होते.

Web Title: Ram Raje Naik-Nimbalkar, Prithviraj Chavan, Shivendra Singh Raje Bhosle families dominated in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.