माढा लोकसभा मतदारसंघावर सातारकरांचाच दावा; रामराजे, रणजितसिंह अन् जानकरही तयारीत
By दीपक शिंदे | Published: March 7, 2024 04:25 PM2024-03-07T16:25:09+5:302024-03-07T16:25:39+5:30
आघाडी शांततेच्या भूमिकेत, संजीवराजे यांच्यासाठी रामराजे आग्रही
दीपक शिंदे
सातारा : माढा शरद पवार यांच्या प्रतिनिधीत्वामुळे प्रतिष्ठेचा झालेला मतदारसंघ. सध्या भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर प्रतिनिधीत्व करत आहेत. हा मतदारसंघ भाजपकडे असलातरी महायुतीतून राष्ट्रवादीला मिळण्यासाठी रामराजे नाईक-निंबाळकर प्रयत्नशील आहेत. तर खासदार रणजितसिंह पुन्हा तयारीत आहेत. त्याचबरोबर महायुतीतील ‘रासप’चे महादेव जानकर यांनी स्वबळाची घोषणा केली आहे. त्यामुळे माढा मतदारसंघात सातारकरांचा अधिक दावा असून, आघाडीत शांतता दिसत आहे.
माढा लोकसभा मतदारसंघात सातारा जिल्ह्यातील फलटण, माण हे दोन तर सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, माळशिरस आणि सांगोला हे चार विधानसभा मतदारसंघ येतात. मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर २००९ मध्ये पहिल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विजय मिळवला त्यांनी सुमारे ३ लाखांचे मताधिक्य घेतले होते. त्यानंतर २०१४ मध्ये राष्ट्रवादी पक्षाचाच उमेदवार विजयी झाला. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील हे खासदार झाले. पण त्यांना केवळ काठावरचे मताधिक्य मिळाले होते. त्यावेळी महायुतीतील सदाभाऊ खोत यांनी निकराची झुंज दिली होती.
त्यानंतर २०१९च्या निवडणुकीत रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांचा सुमारे ८५ हजारांच्या मताधिक्याने पराभव केला. सध्याची स्थिती पाहता महायुतीत भाजपकडे हा मतदारसंघ आहे. असे असलेतरी महायुतीमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या अजित पवार गटाकडून माढा मतदारसंघाची जागा मिळावी, अशी मागणी होत आहे. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी बंधू संजीवराजे नाईक- निंबाळकर यांच्यासाठी ही जागा मागितली आहे; पण भाजप ही जागा सहजासहजी सोडेल, अशी स्थिती नाही. रणजितसिंह नाईक- निंबाळकरांनी या मतदारसंघात आत्तापर्यंत सर्वाधिक कामे केल्याचा दावा केला आहे. तर विरोधकांकडून खासदारांबाबत नाराजी असल्याचा आरोप केला जात आहे. तरीही या मतदारसंघात भाजपचाच उमेदवार असणार, हे निश्चित आहे. पण, बदलत्या राजकीय घडामोडीत बरंच काही होऊ शकते.
महायुतीत ‘रासप’चे अध्यक्ष महादेव जानकर आहेत. त्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. माढा आणि परभणी मतदारसंघातून लढण्याची घोषणा केली आहे. जानकर यांची घोषणा अंमलात आली तर माढ्यात भाजपला कडवी झुंज मिळू शकते. त्यातच जानकर यांच्यावर महाविकास आघाडीकडून जाळे टाकण्याचा प्रयत्न होत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आग्रही असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे माढा मतदारसंघाचा तिढा युतीसाठी तरी वाढला आहे. पण, सातारा जिल्ह्यातीलच अनेक जण माढासाठी तयारीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
संजीवराजे यांच्यासाठी रामराजे आग्रही
- रामराजेंनी आपले बंधू संजीवराजे यांच्यासाठी माढा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, अशी मागणी केली आहे. भाजप आपला मतदारसंघ सोडण्याच्या मानसिकतेत नाही.
- ‘रासप’ला महाविकास आघाडी आपल्या सोबत घेण्याच्या तयारीत आहे. विजयसिंह मोहिते-पाटील यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी लोकसभेची चांगली संधी आहे.
असा झाला बदल
२०१९ गत निवडणुकीतील फॅक्टर
- शरद पवार यांच्यानंतर विजयसिंह मोहिते-पाटील यांनी मतदारसंघाची धुरा सांभाळली.
- राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यामुळे याठिकाणी संजय शिंदे यांना उमेदवारी मिळाली.
- भाजपकडून त्यांना देण्याऐवजी रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी मिळाली.
- माळशिरस तालुक्यातून रणजितसिंहांना चांगले मतदान झाल्याने विजय सोपा झाला.
- ८५ हजारांचे मताधिक्य रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना मिळाले.
मतदारसंघ पुरुष स्त्री एकूण
करमाळा १६५२२६ १४९४८३ ३१४७१८
माढा १७५४१५ १५७५५४ ३३२९७१
सांगोला १६१३६३ १४६२९४ ३०७६६५
माळशिरस १७३३६८ १६०२१८ ३३३६१८
फलटण १७०६४१ १६२३६३ ३३३०१८
माण १७७८१९ १६७४५० ३४५२७९
एकूण १०२३८३२ ९४३३६२ १९६७२६९
आमदार किती कुणाचे
काँग्रेस - ००
राष्ट्रवादी अजित पवार गट - ०३
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार - ००
शिवसेना शिंदे गट - ०१
भाजप - ०२