रामराजे शशिकांत शिंदेंचे ऐकत नव्हते!
By admin | Published: October 27, 2015 10:18 PM2015-10-27T22:18:35+5:302015-10-27T23:56:01+5:30
जयकुमार गोरेंचा गौप्यस्फोट : निधीसाठी पृथ्वीराज चव्हाणांना शब्द टाकण्याची म्हणे खासगीत विनंती
दहिवडी : ‘रामराजे माझे ऐकत नाहीत, पक्षाचा विषय असल्याने मी उघड भूमिका घेऊ शकत नाही. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाणांना सांगून जिहे-कठापूरसाठी निधीची तरतूद करावी, अशी विनंती वारंवार तत्कालीन जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे गेल्यावर्षी माझ्याकडे करत होते,’ असा खळबळजनक गौप्यस्फोट आमदार जयकुमार गोरे यांनी केला आहे.
बोराटवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत आमदार जयकुमार गोरे बोलत होते. यावेळी बाजार समितीचे सभापती अरुण गोरे, माढा युवक काँग्रेसचे अध्यक्ष सोमनाथ भोसले, जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब काळे उपस्थित होते.
गोरे म्हणाले, ‘मंत्री झाल्यावर एका वर्षात जिहे-कठापूरचे पाणी नेर तलावात सोडण्याची फुशारकी मारली होती. पाणीही आणले नाही आणि निधीची तरतूदही केली नाही. ते तुमच्या आवाक्यातही नव्हते. पृथ्वीराज चव्हाणांच्या आदेशाने जिहे-कठापूरसाठी निधीची तरतूद केल्याबद्दल माझे आभार मानले होते, हे शशिकांत शिंदे विसरले आहेत.’
गोरे म्हणाले, ‘पाठीमागील १५ वर्षे राज्याचे जलसंपदा, अर्थ खाते, कृष्णा खोरे महामंडळ अध्यक्षपद राष्ट्रवादीकडेच होते. खटाव-माण मतदारसंघांचा समावेश असलेल्या माण लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व दस्तुरखुद्द शरद पवार करत होते. तरीही उरमोडीचे पाणी माण, खटावला यायला आणि जिहे-कठापूरला निधी मिळायला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचीच वाट का पाहायला लागली, याचे उत्तर आ. शशिकांत शिंदेंनी जनतेला द्यावे.’
आमदार जयकुमार गोरे पुढे म्हणाले, ‘मी आजपर्यंत इतरांशी माण-खटावच्या मातीत पाणी नेण्याची स्पर्धा केली आहे. पालकमंत्री शिवतारे किंवा आमदार शिंदेंशी श्रेय घेण्यासाठी मला स्पर्धा करायची नाही. एक रुपयाचाही निधी पाणी योजनांना न आणणाऱ्यांना बेरजेत न धरलेलेच बरे. आमदार शिंदेनी जिहे-कटापूरवरुन विनाकारण श्रेयवाद उकरुन काढला आहे. पाणी योजनांसाठी कोणी प्रयत्न केले याचे पुरावे देतो. मी आणि पालकमंत्री शिवतारे एकत्र एकाच व्यासपीठावर जाऊ आणि खरे खोटे करू,’ असे आव्हान त्यांनी दिले.
‘जिहे-कठापूरचे काम गतीने होण्यासाठी माझे श्रेय किती आहे, यासाठी आ. शिंदेच्या प्रमाणपत्राची मला गरज नाही. मी आमदार झाल्यापासून दरवर्षी अधिक निधीच आला आहे. योजनेच्या निर्मितीपासून २००९ पर्यंत फक्त ८२ कोटींचा निधी या योजनेसाठी आला होता. मात्र, माझ्या कार्यकाळात मी अधिकाऱ्यांच्या मुख्यमंत्र्यासोबत बैठका घेऊन २१६ कोटी निधी व १०४ कोटींची तरतूद मिळवून योजनेला गती दिली,’ असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
वीस कोटींचा प्रस्ताव अजित पवारांकडे रखडला
आ. शिंदेनी या योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी मंत्री असताना शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यामध्ये वाढीव खर्चाला मान्यता मिळण्याचीही मागणी केली होती. मात्र तो प्रस्ताव अजित पवारांच्या अर्थ खात्याकडे अडकून पडला होता. ही बाब मी पुसेगावच्या सभेतही शिंदे यांच्यासमक्ष सांगितली होती. जो २० कोटींचा प्रस्ताव पृथ्वीराज चव्हाणांकडे आला होता, तो मंजूरही झाला होता. म्हणजेच योजनेची फाईल अजित पवारांच्या अर्थमंत्रालयाकडून शेवटपर्यंत क्लिअर झाली नाही, हे तुम्हालाही माहीत आहे,’ असा आरोपही आमदार गोरे यांनी केला.