कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रमजान ईद साध्या पद्धतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:36 AM2021-05-15T04:36:54+5:302021-05-15T04:36:54+5:30
फलटण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर आणि तालुक्यात रमजान ईद घरगुती वातावरणात साजरी करण्यात आली. संपूर्ण जग लवकर कोरोनामुक्त ...
फलटण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर आणि तालुक्यात रमजान ईद घरगुती वातावरणात साजरी करण्यात आली. संपूर्ण जग लवकर कोरोनामुक्त होवो, आजारी लोक बरे होवोत, अशी प्रार्थना करण्यात आली.
रमजान ईद ही मिठी ईद म्हणूनही ओळखली जाते. या दिवशी मुस्लीम बांधव आपापल्या घरी मिष्टान्न तयार करतात. विशेष म्हणजे रमजान ईद दिनी शीरखुर्मा करून खाण्याची पद्धत आहे. रमजान ईद दिनी गळाभेटीला विशेष महत्त्व असते. मात्र, कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर घरीच राहून ईद साजरी करावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले होते. त्यामुळे मुस्लीम बांधवांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत आपापल्या घरीच रमजान ईदची नमाज अदा करून घरगुती ईद साध्या पद्धतीने साजरी केली. यावेळी अल्लाहकडे संपूर्ण जग लवकर कोरोनामुक्त होवो, जे आजारी आहेत ते लवकर बरे होवोत, अशी प्रार्थना करण्यात आली. कोणीही नवीन कपडे खरेदी न करता गरजूंना मदत केली. रमजान ईद हिंदू-मुस्लीम एकत्र येऊन उत्साहात साजरी करतात; पण कोरोनामुळे मोबाईल आणि सोशल मीडियाद्वारे एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या. रमजान ईदनिमित्त मुस्लीम बांधवांना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर,आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य संजीवराजे नाईक-निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, आयुर उद्योग समूहाचे प्रमुख दिगंबर आगवणे यांनी शुभेच्छा दिल्या.