निवडणुकीत रमली नातीगोती!

By admin | Published: November 2, 2016 12:03 AM2016-11-02T00:03:30+5:302016-11-02T00:03:30+5:30

लढतीकडे लक्ष : दीर-भावजय, वडील-मुलगी, काका-पुतण्याचा उमेदवारांमध्ये समावेश

Ramali natigoti elections! | निवडणुकीत रमली नातीगोती!

निवडणुकीत रमली नातीगोती!

Next

 सातारा : सातारा नगरपालिकेच्या गेल्या निवडणुकीमध्ये सातारा विकास आघाडी व नगर विकास आघाडीचे मनोमिलन असल्याने दोन्ही नेते आपापसात चर्चा करून उमेदवारी देत होते. त्यामुळे इतर आघाड्याही निवडणूक रिंगणात उतरत नव्हत्या. यंदा मात्र मनोमिलन दुभंगल्याने ताकदवर उमेदवारांचा शोध सुरू होता. त्यातून बहीण-भाऊ, नवरा-बायको, वडील-मुलगी रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीतील लढती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्या आहेत.
गेल्या दहा वर्षांपासून सातारा पालिकेमध्ये मनोमिलनाची सत्ता होती. दोन्ही आघाडीतील नेते सांगेल तोच उमेदवार निवडणुकीला सामोरे जायचा. परंतु या पंचवार्षिकला मनोमिलन दुभंगल्याने अनेकांना नगरसेवक होण्याचे स्फुरण चढले. प्रत्येक पेठेमध्ये कोणी-ना कोणी पुढे येऊन समाजकार्य करतच असतो. त्यातूनच पुढे भावी नगरसेवक म्हणून लोक त्याच्याकडे पाहत असतात. घरातील एक व्यक्ती जरी राजकारणात असली तरी त्यांचे जवळचे नातलग भाऊ-चुलत भाऊ, पुतण्या-काका, मुलगी असे लोक मग त्यांचा वारसा चालविण्यासाठी पुढे येत असतात. सातारा पालिकेच्या निवडणुकीमध्येही अशीच नातीगोती असणारे उमेदवार रिंगणात उतरल्याचे पाहायला मिळत आहे.
पालिकेच्या सभागृहात विरोधी पक्षनेते म्हणून भूमिका बजावणारे अ‍ॅड. बाळासाहेब बाबर यांची मुलगी प्रिया बाबरही पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. वडील आणि मुलगी दोघेही मनसेकडून लढत आहेत.
गेल्या निवडणुकीत सातारा विकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या आशा पंडित आणि किशोर पंडित यांनी यावेळेस भाजपमध्ये प्रवेश केला. हे दाम्पत्य दोन वेगवेगळ्या वॉर्डातून निवडणूक लढवत आहेत. तसेच नगर विकास आघाडीतून सातारा विकास आघाडीमध्ये प्रवेश केलेले वसंत लेवे यांचा पुतण्या सतीश ऊर्फ पप्पू लेवे हे दोघेही एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत.
सतीश लेवे हे भाजपमधून निवडणूक लढवत आहेत. तसेच सातारा विकास आघाडीतर्फे सुहास राजेशिर्के आणि अपक्ष शुभांगी राजेशिर्के हे दीर-भावजय एकमेकांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तर भाजपमधून महेश गोंदकर आणि सीमा गोंदकर हेही निवडणूक लढवत आहेत.
हे सर्व उमेदवार आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत. या लढतीमध्ये नात्यामध्ये कोण एकमेकांच्या पुढे जातेय, याची उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे. (प्रतिनिधी)
आज होणार छाननी
सातारा पालिकेच्या ४० जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत उमेदवारांचा भरणा जास्त आहे. तसेच सातारा विकास आघाडी आणि नगर विकास आघाडीसह भाजप, शिवसेना आणि मनसेसह अन्य पक्षही या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दरम्यान, बुधवारी पालिकेमध्ये बुधवारी सकाळी अकरापासून उमेदवारांनी भरलेल्या अर्जाची छाननी होणार आहे.

Web Title: Ramali natigoti elections!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.