रामराजेंचे शहाणपण सत्ता असतानाही चालू दिले नाही, जयकुमार गोरेंचा टोला
By नितीन काळेल | Published: March 30, 2023 07:10 PM2023-03-30T19:10:37+5:302023-03-30T19:11:02+5:30
संजय राऊत यांना मिरजलाच तपासणीसाठी नेले पाहिजे
सातारा : ‘रामराजेंना कोरेगाव तालुक्यात काॅरिडाॅर हवा. राष्ट्रवादीचे माणमधील नेते म्हसवडला होण्यासाठी आंदोलन करतात. आता म्हसवडलाच काॅरिडाॅर होणार असून यासाठी कोणीही फूस लावू द्या. कारण, सत्ता असताना रामराजेंचे शहाणपण चालू दिले नाही. आता त्यांच्याकडे सत्ताच नाही,’ असा जोरदार टोला भाजपचे जिल्हाध्यक्ष, आमदार जयकुमार गोरे यांनी लगावला. तर संजय राऊत यांच्यावर मिरजच्या हाॅस्पिटलमध्ये तपासणी करावी लागेल, असा हल्लाबोल केला.
सातारा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष गोरे बोलत होते. यावेळी अतुल भोसले, मनोज घोरपडे, धैर्यशील कदम, विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार आदी उपस्थित होते. राज्यात भाजप आणि शिवसेनेच्या वतीने (शिंदे गट) सावरकर गाैरव यात्रा काढण्यात येणार आहे. याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद झाली.
जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे म्हणाले, ‘काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी हे मागील काही वर्षांपासून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अपमानकारक वक्तव्ये करत आहेत. त्यांनी सावरकर यांना बदनाम करण्याचा अजेंडाच ठेवला आहे. त्याला विरोध करणे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कार्य, विचार लोकांत पोहोचण्यासाठी सत्ताधारी भाजप-शिवसेनेने राज्यात ‘सावरकर गाैरव यात्रा’ काढण्याचे नियोजन केले आहे. सातारा जिल्ह्यातही भाजपकडून या यात्रेचे नियोजन झालेले आहे. ३१ मार्चपासून ही यात्रा सुरु होणार असून ६ एप्रिलपर्यंत चालेल. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात यात्रा निघेल. मोठ्या गावातून यात्रा जात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार लोकांत पोहोचविण्याचे काम करेल.
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी सावरकरांचे हिंदुत्वाचे विचार घेतले. तर इंदिरा गांधी यांनी सावरकर यांचा सन्मान केला असे सांगून जिल्हाध्यक्ष गोरे म्हणाले, ‘उध्दव ठाकरे हे महाविकास आघाडीत आहेत. त्यांची सत्तेसाठी आघाडी झाली, तेथे विचार नव्हता. उध्दव ठाकरे सावरकरांसाठी आघाडी सोडणार आहेत का ? हा विषय आहे. राहुल गांधी यांचा तर तीव्र शब्दांत निषेध. कारण, त्यांना आपल्या पूर्वंजांचा विचारच कळलेला नाही.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अदानीप्रकरणावरुन लक्ष दुसरीकडे वळण्यासाठी सत्ताधारी हे ‘सावरकर गाैरव यात्रा’ काढत आहेत, अशी टीका केली असल्याचा प्रश्न पत्रकारांनी केला. यावर संजय राऊत यांना मिरजलाच तपासणीसाठी नेले पाहिजे. कारण, तेथे कृपामाई हाॅस्पिटल चांगले आहे. विनाकारण लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी राऊत असे वक्तव्य करीत आहेत, अशा शब्दांत गोरे यांनी त्यांचा समाचार घेतला. तर राज्य सरकारच्या प्रश्नावर आताचे सरकार आपला कार्यकाल पूर्ण करेल. २०२४ च्या निवडणुकीतही भाजप राज्यात पूर्ण ताकदीने येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
रामराजे माजी सभापती; झेडपी पक्ष चिन्हावरच...
पत्रकारांनी रामराजेंचा प्रश्न केल्यावर गोरे यांनी त्यांना माजी सभापती म्हणा. कशाला सारखा त्यांचा विचार करता असे सांगितले. तर जिल्ह्यातील नगरपालिका आणि पंचायत समिती, जिल्हा परिषदेची निवडणूक भाजप पक्ष चिन्हावर लढेल. काॅंग्रेस-राष्ट्रवादीशी कोठेही तडजोड होणार नाही, असेही स्पष्ट केले.