माणच्या सभापतिपदी रमेश पाटोळे निश्चित
By admin | Published: March 6, 2017 11:48 PM2017-03-06T23:48:42+5:302017-03-06T23:48:42+5:30
पंचायत समिती : उपसभापतिपदासाठी अनेकांची नावे चर्चेत; शेखर गोेरेंच्या निर्णयाकडे लक्ष
म्हसवड : माण पंचायत समितीचे सभापतिपद हे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित आहे. या पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आलेले मार्डी गणातील उमेदवार रमेश पाटोळे एकमेव दावेदार असून, सभापतिपदी रमेश पाटोळे यांची निवड निश्चित मानली जात आहे. तर उपसभापतिपदी इच्छुकांची संख्या अधिक असली तरी राष्ट्रवादीचे नेते शेखर गोरे यांचा निर्णय या निवडीत अंतिम असून, ते कोणाला संधी देतात? याकडे लक्ष लागले आहे.
माण पंचायत समितीत सत्तांतर घडवत राष्ट्रीय काँग्रेसकडे असणारी सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसकडे बहुमतासह खेचून आणण्यात शेखर गोरे यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे पदाधिकारी निवडीत शेखर गोरेंचा शब्द अंतिम राहणार आहे. पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ सहावर पोहोचले आहे तर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला तीन जागांवर समाधान मानावे लागले आहे. पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेस ६, राष्ट्रीय काँग्रेस ३, भाजपा १ असे पक्षीय बलाबल आहे.
सभापतिपदाच्या आरक्षणाचा एकमेव सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याने सभापतिपदी रमेश पाटोळेंची वर्णी निश्चित मानली जात आहे. तर उपसभापतिपदासाठी रस्सीखेच होऊ शकते. उपसभापतिपदाच्या शर्यतीत विजयकुमार मगर, तानाजी कट्टे, पै. नितीन राजगे, कविता जगदाळे व लतिका वीरकर यांचा समावेश आहे. त्यामुळे मलवडी गणातून निवडून आलेले विजयकुमार मगर यांच्याकडे पाहिले जात असून, वरकुटे म्हसवड गणांतून रासप व राष्ट्रवादीपक्षाच्या युतीच्या उमेदवार लतिका वीरकर, गोंदवले बुद्रुक गणातून निवडून आलेले तानाजी कट्टे, पळशी गणातून निवडून आलेले शेखर गोरेंचे निष्ठावान समजले जाणारे पै. नितीन राजगे, आंधळी गटातून निवडून आलेल्या कविता जगदाळे यापैकी कोणाला संधी मिळणार? याची उत्सुकता लागून राहिली आहे. (प्रतिनिधी)