पालिका शाळांना द्यायचीय खासगीला टक्कर!
By admin | Published: February 7, 2017 11:10 PM2017-02-07T23:10:04+5:302017-02-07T23:10:04+5:30
पट वाढविण्यासाठी खटाटोप : ज्ञानरचनावादाचे गुरुजनांना प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण
सातारा : सातारा पालिकेच्या एकेकाळी ३५ शाळा होत्या. ही संख्या घटून निम्म्यावर आली असून, केवळ अठरा शाळा ज्ञानदान करत आहेत. तरीही पालिका प्रशासनाने हार मानलेली नाही. खासगी शिक्षण संस्थांना टक्कर देण्याची तयारी ठेवली असून, शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी ज्ञानरचनावादाचे शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले.
सातारा तालुक्यातील कुमठे बीटमधील असंख्य शाळा ज्ञानरचनावादच्या यशस्वी प्रयोगासाठी राज्यात प्रसिद्ध आहे. या शाळेने सन २०१० मध्ये सुरू केलेल्या या शिक्षण पद्धतीमुळे सातारा तालुक्यातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढत आहे. राज्यभरातील अनेक शिक्षकांनी येथे भेटी देऊन आपापल्या शाळेत उपक्रम राबविला आहे. आता सातारा नगरपालिका शाळादेखील हा उपक्रम शाळेत राबविणार आहे. येथील शाळा क्रमांक एकमध्ये शिक्षकांना प्रशिक्षण दिले जात आहे.
पालिका शाळांमध्ये पाठांतर पद्धत होती. आता विद्यार्थ्यांची आकलन शक्ती वाढविण्यासाठी ज्ञानरचनावादातून शिकविण्याची तयारी नगरपालिका शिक्षण मंडळाने हाती घेतली आहे. या पद्धतीत शिकविण्यापेक्षा शिकण्यावर भर देण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढणार आहे. शाळेची पटसंख्या वाढीसाठी हा प्रकल्प उपयोगी राहणार आहे, असा विश्वास व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)
सेमी इंग्रजीचाही पर्याय उपलब्ध
दरम्यान, पालिकेच्या शाळांची पटसंख्या ही खासगी शाळांमुळे दरवर्षी कमी होत आहे. यासाठी खासगी शाळेच्या तुलनेने विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे व पालकांचा पालिका शाळेला बघण्याचा दृष्टिकोन बदलावा, यासाठी ज्ञानरचनावाद व सेमी इंग्रजी असे शाळेत शिकविण्याचे बदल केले आहेत, असे शिक्षण तज्ज्ञांनी ‘लोकमत’ला सांगितले.