साताऱ्यातील सजग नागरिकांमुळे दरोडा टळला : कुपर कॉलनीतील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 12:41 AM2018-11-17T00:41:49+5:302018-11-17T00:41:57+5:30
अलिशान गाडीतून कुपर कॉलनीत येऊन संशयितरीत्या फिरणाºया दोघांना जागृत नागरिकांनी हटकताच संबंधितांनी गाडी जागेवरच सोडून घटनास्थळावरून धूम ठोकल्याची
सातारा : अलिशान गाडीतून कुपर कॉलनीत येऊन संशयितरीत्या फिरणाºया दोघांना जागृत नागरिकांनी हटकताच संबंधितांनी गाडी जागेवरच सोडून घटनास्थळावरून धूम ठोकल्याची खळबळजनक घटना गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, सदर बझारमधील कुपर कॉलनीमध्ये गुरुवारी रात्री साठेआठच्या सुमारास एका अलिशान गाडीतून दोन युवक आले. गाडीतून उतरल्यानंतर दोघेही कॉलनीत चालत फिरत होते. हा प्रकार एका सतर्क नागरिकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी कॉलनीतील इतर नागरिकांना याची कल्पना दिली. त्यानंतर कॉलनीतील पृथ्वीराज पवार, राजन धुमाळ, मुकुंदराव मोघे, मोहनराव जाधव, अण्णा गरगटे यांच्यासह दहा ते पंधराजण संबंधितांच्या गाडीजवळ थांबले. तोपर्यंत संबंधित दोन युवक कॉलनीतून फिरून गाडीजवळ आले. नागरिकांनी तुम्ही इथे कोणाकडे आला आहात, याची विचारपूस केली.
त्यावेळी त्या युवकांनी आम्ही बेंगलोर येथून आलो असून, सचिन नावाच्या व्यक्तीकडे पैसे नेण्यासाठी आल्याचे त्यांनी सांगितले. दोघेही युवक उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले; परंतु अशाही परिस्थितीत त्यांनी कारमध्ये बसून पळून जाण्याचा प्रयत्न केला. एका नागरिकाने हातचलाखी करून कारची चावी काढून घेतली. त्यामुळे दोघेही कारमधून खाली उतरले. हे दोघेही चोर असावेत, अशी नागरिकांना पक्की खात्री पटली, काही नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. जमाव मोठ्या संख्येने जमू लागल्यानंतर संबंधित दोघा युवकांची भीतीने गाळण उडाली. मोबाईलवर बोलण्याचे नाटक करत अचानक दोघांनीही अंधाराचा फायदा घेत तेथून धूम ठोकली. नागरिकांनी त्यांचा पाठलाग केला; परंतु ते सापडले नाहीत. सुमारे दीड तासानंतर पोलिसांच्या दोन गाड्या कुपर कॉलनीत आल्या. पोलिसांनी कारची डीकी उघडली असता कारमध्ये आठ ते दहा टॉमी, चांदीची भांडी, काही रोकड, कपडे असे साहित्य सापडले. नागरिकांमुळे मोठा दरोडा टळला.
पोलीस वेळेत आले असते तर...
कॉलनीत संशयितरीत्या फिरणाºया दोघांना नागरिकांनी बराचवेळ बोलण्यात गुंतवून ठेवले होते. त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला जात होता. याचवेळी काहीजण पोलिसांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते. एवढेच नव्हे तर परिसरात असललेल्या दोन पोलीस चौकीतही काहीजण जाऊन आले; परंतु चौकी बंद होती. कंट्रोल रूमपासून आपापल्या ओळखीच्या बºयाच पोलिसांना नागरिकांनी फोन लावले. सरतेशेवटी पोलीस निरीक्षक सारंगकर यांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी दोन पोलीस गाड्या त्या ठिकाणी पाठविल्या; परंतु पोलीस जर वेळेत येथे आले असते तर संशयित युवक रंगेहाथ सापडले असते, असे नागरिकांमधून बोलले जात आहे.
संबंधित गाडी चोरीची असावी. कर्नाटकातील गाडी मालकापर्यंत आम्ही तपास केला आहे. लवकरच संबंधिताचा छडा लागेल.
-नारायण सारंगकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सातारा शहर