आक्रमक विरोधकांना तोंड देताना रामराजेंचे कसब लागणार पणाला!

By admin | Published: July 11, 2014 12:20 AM2014-07-11T00:20:01+5:302014-07-11T00:29:02+5:30

राजेंच्या भूमिकेकडे लक्ष

Ramraja will have to work hard to face aggressive opponents. | आक्रमक विरोधकांना तोंड देताना रामराजेंचे कसब लागणार पणाला!

आक्रमक विरोधकांना तोंड देताना रामराजेंचे कसब लागणार पणाला!

Next

फलटण : फलटण तालुक्यात असलेल्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर तालुक्यातील विरोधकांनी एकत्र येऊन सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा केलेला प्रयत्नामुळे तालुक्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. निवडणूक काळात ‘सत्ताधारी विरुद्ध विरोधक’ असा सामना अधिक आक्रमक रंगण्याची शक्यता आहे.
फलटण तालुक्यावर राज्य नियोजन मंडळाचे कार्यध्यक्ष रामराजे नाईक-निंंबाळकर यांची एकहाती सत्ता आहे. या सत्तेला आव्हान देण्याचा गेल्या २२ वर्षांपासून विरोधकांनी केलेला प्रयत्न रामराजेंनी उधळून लावलेला आहे. विरोधकांच्या आपापसातील दुहीचा फायदा रामराजेंना झाला आहे. तालुक्यात एकहाती सर्व संस्थावर सत्ता असल्याने कार्यकर्त्यांचा प्रचंड संच रामराजेंकडे आहे. यामध्ये सर्व प्रकारचे कार्यकर्ते आले असले तरी काही गुंडगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे राजेगटाला फटका बसू लागला आहे.
गेल्या दोन वर्षांत माजी आमदार, चिमणराव कदम व न्यू फलटण शुगर साखरवाडीचे चेअरमन प्रल्हाद साळुंखे-पाटील यांच्याशी चांगले जुळवून घेत बऱ्याचशा मोठ्या ग्रामपंचायती विरोधकाकडे वळविण्यात स्वराज्य उद्योग समूहाचे प्रमुख रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना यश मिळाले आहे. जशास तसे या नात्याने विरोधक मैदानात उतरल्याने तरुण वर्गही त्यांना साथ देऊ लागला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी आपले उपद्रवमूल्य दाखवून दिल्याने सत्ताधाऱ्यांना अडचणीत आले.
तालुक्यात प्रचंड चोऱ्या, मारामाऱ्या दाखल आहेत. पत्रकारांवरील हल्ले, दरोडे तसेच वाळूसम्राट मुजोर बनून तहसीलदार व सहकाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. गुंडागिरीत प्रचंड वाढ झाली असून, नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. ज्यांना मुली आहेत, त्या पालकांना आपल्या मुलीची शाळा, कॉलेजला गेल्यावर परत घरी येईपर्यंत काळजी वाटू लागली आहे. त्यातच राष्ट्रवादीच्या माजी युवक जिल्हाध्यक्षाच्या घरात घुसून झालेली मारहाण, माजी आ. चिमणराव कदम यांना आलेल्या धमकीचा फोन यामुळे तालुक्यातील वातावरण ढवळून निघाले. या गोष्टीचा फायदा उचलत विरोधकांनी एकत्र येत सत्ताधाऱ्यांना टार्गेट केले. विरोधकांनी घेतलेल्या निषेध सभेला जनसामान्यातून मिळालेल्या प्रतिसादामुळे विरोधकांचे मनोबल उंचावले गेले. त्यांनी प्रचंड टीका सत्ताधाऱ्यांवर केल्याने सध्या सत्ताधारी बॅकफूटवर दिसत आहे. (प्रतिनिधी)

तालुक्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत लोकप्रतिनिधी या नात्याने रामराजेंना गांभीर्यांनी विचार करण्याची गरज आहे. कार्यकर्ते चुकीचे वागत असतील तर त्यांना समज देण्याचे किंवा राजकिय प्रक्रियेतून बाजूला काढण्याचे धाडस त्यांना दाखवावे लागणार आहे. आक्रमक विरोधकांना रामराजे कसे तोंड देतात, याची उत्सुकता आता सर्वांना लागून राहिलेली आहे.

Web Title: Ramraja will have to work hard to face aggressive opponents.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.