रामराजे-उदयनराजे यांची वाढती जवळीक, कोणाला मारक आणि कोणाला तारक

By दीपक शिंदे | Published: January 17, 2024 09:33 PM2024-01-17T21:33:37+5:302024-01-17T21:35:15+5:30

रामराजे नाईक-निंबाळकर आणि छ. उदयनराजे भोसले यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या दोघांची जवळीक वाढली आहे.

Ramraje naik nimbalkar and Udayanraje bhosale met, discussion in maharashtra politics | रामराजे-उदयनराजे यांची वाढती जवळीक, कोणाला मारक आणि कोणाला तारक

रामराजे-उदयनराजे यांची वाढती जवळीक, कोणाला मारक आणि कोणाला तारक

फलटण : भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांची फलटण येथील लक्ष्मीविलास पॅलेस निवासस्थानी अचानक भेट घेऊन सुमारे अर्धा तास बंद दाराआड चर्चा केली. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी आयोजित केलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमास येऊन रामराजेंची भेट घेतल्यामुळे माढा आणि सातारा लोकसभा निवडणुकीत रामराजे केंद्रबिंदू असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि राज्यसभेचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यातील वाद सर्वश्रुत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून या दोघा जणांची जवळीक वाढल्याचे चित्र दिसत असून ही जवळीक कुणाला मारक ठरणार असा प्रश्न सर्वसामान्यांमध्ये उपस्थित होत आहे. उदयनराजेंनी राष्ट्रवादीला रामराम करेपर्यंत दोन्ही राजेंमध्ये झालेल्या टोकाच्या वादांचा साक्षीदार उभा महाराष्ट्र आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून दोघांमधील मतभेद संपल्याचं चित्र आहे. पुण्यातील एका विवाह सोहळ्यात उदयनराजे भोसले आणि रामराजे नाईक निंबाळकर समोरासमोर आले. ही भेट साधीसुधी नव्हती, तर दोघांनी चक्क गळाभेट घेतली.

काही महिन्यांपूर्वी सातारा शासकीय विश्रामगृहात आणि आता आज झालेल्या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी रामराजे नाईक निंबाळकर आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. राष्ट्रवादीमध्ये असणारे उदयनराजे अचानक खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये गेले.

दोघांमधील वाद इतका ताणला गेला होता की खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांमधील वाद सोडवण्यात पवारांनाही यश आले नव्हते. या दोघांमधील वाद सातारा जिल्ह्याने वेळोवेळी पाहिला आहे.

आज माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या पटांगणावर वचनपूर्ती मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यासाठी खासदार उदयनराजे भोसले उपस्थित होते. मात्र, कार्यक्रम संपल्यानंतर उदयनराजे यांचा ताफा थेट रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या लक्ष्मीविलास पॅलेसवर दाखल झाला आणि रामराजेंच्या निवासस्थानी उदयनराजे यांनी अचानकपणे भेट घेऊन सुमारे अर्धा तास बंद दाराआड चर्चा केली. तत्पूर्वी या दोघा जणांनी एकमेकांना नमस्कार करून अदबीने विचारपूस केली. स्मित हास्य करीत फोटोसाठी पोज सुद्धा दिली. मात्र बंद दाराआड काय चर्चा झाली हे समजू शकले नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून या दोघा जणांची जवळीक वाढल्याचे चित्र दिसत असून ही जवळीक कुणाला मारक ठरणार असा प्रश्न सर्वसामान्यांमध्ये उपस्थित होत आहे.

Web Title: Ramraje naik nimbalkar and Udayanraje bhosale met, discussion in maharashtra politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.