शरद पवार असो अगर अजित पवार जिल्ह्यात 'रामराजे'च; जिल्ह्याच्या राजकारणावर पकड
By दीपक शिंदे | Published: September 28, 2023 09:33 AM2023-09-28T09:33:10+5:302023-09-28T09:33:35+5:30
संजीवराजेंना जिल्हाध्यक्ष करून एका दगडात मारले अनेक पक्षी : रामराजेंची जिल्ह्याच्या राजकारणावर पकड कायम
सातारा - राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला सातारा जिल्हा हा कायम शरद पवारांच्या मागे भक्कम उभा राहिला. त्यांनीही जिल्ह्यातील नेत्यांना भरभरून दिले; पण या मोहात काही जण एवढे अडकले की कोणी काय दिले, याचा विसर पडून कोणाकडून काय मिळणार याचाच विचार करू लागले. शरद पवारांना सोडून अजित पवारांच्या गोटात गेलेले अनेक जण अजून काही तरी मिळविण्यासाठीच गेले हे सांगायला काही ज्योतिषाची गरज नाही. तरीही सातारा जिल्ह्यावर आपलेच राज्य असायला हवे यासाठी रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपले बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांनाच अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष केले. त्यामुळे शरद पवार असो अगर अजित पवार जिल्हा रामराजेंच्याच ताब्यात राहील याची ही तजवीजच आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी कार्यकर्त्यांची तगडी फळी सातारा जिल्ह्यात उभी केली; पण निष्ठावंत तयार करण्यात ते कमी पडले. काही जण नेतृत्वामुळे, काही जण मैत्रीमुळे तर काही जण शरद पवारांनी आतापर्यंत केेलेल्या मदतीमुळे सोबत राहिले. काहींनी मात्र मागचे पुढचे सर्व काही विसरले आणि पुढे काय होणार, असा भविष्यवेती निर्णय घेतला. भविष्यात काय होणार, हे माहिती नसले तरी अपेक्षा ठेवण्यात काय चुकीचे आहे. त्यांच्या हातात काय पडले हे सर्वांना माहिती आहेच; पण तरी देखील काही तरी नवीन प्रयोग सातारा जिल्ह्यात पाहायला मिळाला हे नक्की.
राजकारणाच्या या टप्प्यावर शरद पवार यांना थांबायला पाहिजे की नको. हा त्यांचा, त्यांच्या पक्षाचा आणि कार्यकर्त्यांचा विषय आहे. त्याचप्रमाणे कोणासोबत राहायचे हा देखील ज्याचा त्याचा विषय आहे. त्यात कोणाला सल्ला देण्याची काहीच गरज नाही; पण सातारा जिल्ह्याच्या राजकारणात आपलाच ठसा कसा राहील यासाठी रामराजे नाईक निंबाळकरांनी आपलेच बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांना अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष करून टाकले. त्याच्या चतुर राजकारणाचा हा भागही असेल. कारण, शरद पवार यांच्या सोबत असतानाही जिल्ह्यात रामराजेंना सोबत घेतल्याशिवाय काही होत नव्हते. आता अजित पवार यांच्याकडे अर्ध्या राष्ट्रवादीचे नेतृत्व गेल्यानंतरही रामराजेंना सोबत घेतल्याशिवाय काहीच होणार नाही. हे देखील स्पष्ट आहे.
जिल्ह्याच्या राजकारणात रामराजेंनी आपली ताकद नक्कीच उभी केली.
दिवंगत खासदार लक्ष्मणराव पाटील यांनी आपली ताकद निर्माण केली होती. त्याचप्रमाणे आज रामराजेंनीही जिल्हा ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मग, ती जिल्हा बँक असो, फलटण नगरपालिका असो, फलटण बाजार समिती असो किंवा आपण ज्या पक्षात काम करतो तो पक्ष असो. रामराजे सध्या मध्यवर्ती भूमिकेत आहेत. आता संजीवराजे यांना जिल्हाध्यक्ष करण्यात रामराजेंची किंवा अजित पवारांची चूक झाली का तर असे अजिबात वाटत नाही. कारण संजीवराजे यांच्यासारखा कर्तबगार आणि जिल्ह्याची खडानखडा माहिती असलेला, लाघवी आणि हसतमुख चेहरा त्यांना दुसरा मिळालाच नसता. यामागे रामराजेंचा स्वार्थ असणार का तर नक्कीच असणार. त्यांना पुढील निवडणुकीत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना चितपट करायचे आहे. त्यामुळे संजीवराजेंचा ते माढा आणि सातारा या दोन्ही ठिकाणी उपयोग करून घेणार यात शंका नाही.
आता मला काय पाहिजे काही नको...
रामराजे नाईक निंबाळकर यांनी राज्याच्या राजकारणात आपला चांगला ठसा उमटविला आहे. त्यामुळे ते सतत म्हणतात. आता मला कुठे काय पाहिजे. मला सर्व काही मिळाले. मग, आहे तिथेच राहिले असते तर काय झाले असते. असा प्रश्न उपस्थित होतो. पण, त्याचे कसे आहे, वडाला आपल्या फांद्या जमिनीत पुन्हा रोवाव्या लागतात. त्या आधारासाठी असल्या तरी तोच आधार पुन्हा वटवृक्षात रूपांतरित होतो. असा आधार आणि पुन्हा त्याचा इतरांना आधार करून देण्याचे काम हे रामराजेंना करायचे होते. त्यांनी ते साध्य केले.
जयकुमार गोरे आणि रणजितसिंहांना धडा शिकवायचाय
आधुनिक भगीरथ म्हणून रामराजे नाईक निंबाळकर यांची दुष्काळी भागातील ओळख. ही ओळख पुसून काढण्याचे काम जयकुमार गोरे यांनी काही वर्षात केले. त्यालाच रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी हातभार लावला. गेल्या टर्मलाच राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याच्या रामराजेंच्या प्रयत्नांना जयकुमार गोरेंनी खीळ घातली. त्यामुळे त्यांना अनेक दिवस ताटकळत राहावे लागले. दुष्काळी भागात आलेले पाणी हे रामराजेंमुळे कसे उशिरा आले हेच रुजविण्याचा प्रयत्न जयकुमार गोरे यांनी केला. त्यामुळे या दोघांना धडा शिकविण्याचा प्रयत्न रामराजे जिल्ह्यावर आपले वर्चस्व दाखवून देऊन करण्याच्या प्रयत्नात असतील.