Satara: शिवरूपराजे यांच्याशी राजकीय संबंध संपले, रामराजे नाईक-निंबाळकर यांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 04:53 PM2024-08-13T16:53:16+5:302024-08-13T16:53:34+5:30
एकवेळ रणजितसिंह यांच्याशी तडजोड करू; त्यांच्याशी नाही
फलटण : ‘महाराष्ट्रासह फलटणच्या राजकारणात आमचा विरोध हा देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार यांना नव्हता. आमचा विरोध हा माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना होता. मी स्वतः देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांना बैठकीत सांगितले होते. प्रशासनाला वेठीस धरून आमच्या कार्यकर्त्यांना खोट्या केसेसमध्ये अडकवणे, अशा प्रकारची टोळीच जिल्ह्यात तयार झाली होती. त्याच्यातले हे एक होते. म्हणून आमचा त्यांच्या उमेदवारीला विरोध होता. एकवेळ माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याशी तडजोड करेन; कारण ते घर इथले आहे; परंतु शिवरूपराजे खर्डेकर यांच्याबरोबर तडजोड करणार नाही,’ असे परखड मत विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केले.
आसू (ता. फलटण) येथे विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन समारंभ पार पडला. त्यावेळी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, विश्वजितराजे नाईक-निंबाळकर, श्रीराम कारखान्याचे संचालक स्वामीनाथ साबळे, राजन फराटे, अशोक तावरे यांच्यासह आसू पंचक्रोशीतील राजे गटाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
आसू गावातील शाळेच्या मैदानावर पेव्हर ब्लॉक बसविणे, बाजार समितीचा उपबाजार व जनावरे बाजार भरविणे, बौद्ध वस्तीमध्ये बौद्धविहार बांधणे अशा विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. तसेच रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
रामराजे म्हणाले, ‘मी जर लोकसभेला माजी खासदारांबरोबर राहिलो असतो तर लोकसभा निवडणुकीनंतर सभापतिपद मला मिळाले असते; परंतु मी नाकारले. सभापतिपद घेऊन काय करू. माझा कार्यकर्ता माझ्याजवळ राहिला नसता. शिवरूपराजे यांना फलटण तालुक्यातील पदे देताना काय अजित पवार यांना विचारून दिली होती काय? आम्ही तुमच्या घराकडे बघून पदे दिली होती. महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जायचे आणि फलटणमध्ये आम्हाला तिकीट मिळणार आहे, असे म्हणून माजी खासदार फलटणमध्ये फिरत आहेत. अजित पवार यांना आम्ही विचारू, नाहीतर आमची भूमिका सांगू, नाहीतर आम्हाला काय करायचे ते करू.
आमची राजकीय सुरूवात या तालुक्याचे भले करण्यासाठी होती. फलटण तालुक्यातील अडचणीत असलेल्या कुठल्या संस्थेबाबत शिवरूपराजे पुढे आले होते. संजीवराजे खरंतर आपण आसू भागातील शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे. कारण जो माणूस आपण त्यांच्यावर लादला त्याच माणसाने त्यांची घरेदारे बघितली नाहीत.’