रामराजेंना शाबासकी... मानकुमरेंना बक्षिशी!
By admin | Published: March 21, 2017 11:20 PM2017-03-21T23:20:37+5:302017-03-21T23:20:37+5:30
वेगवान घडामोडी : पवारांनी तव्यावरची भाकरीच फिरवली
सातारा : जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाचेच खासदार उदयनराजेंची बंडखोरी, पृथ्वीराज चव्हाणांच्या कॉँग्रेसची आक्रमकता अन् महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांच्या भाजपाची व्यूहरचना मोडीत काढत राष्ट्रवादीचा झेंडा फडकविल्याबद्दल फलटणच्या नाईक-निंबाळकर घराण्याला बारामतीकरांनी शाबासकी दिलीय. झेडपी अध्यक्षपदाची माळ रामराजेंचे बंधू संजीवराजे यांच्याच गळ्यात विसावली असून, आमदार शिवेंद्रसिंहराजे गटालाही सांभाळून घेण्याची हुशारी बारामतीकरांनी दाखविलीय. निवडणुकीत उदयनराजेंच्या ताफ्यातील गाड्यांवर तुफान दगडफेक करणाऱ्या वसंतराव मानकुमरेंना त्यांच्या धाडसाची बक्षिसी मिळाली असून, उपाध्यक्षपद त्यांच्याकडे सोपविण्यात आलंय.
पवारांनी ऐनवेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या आग्रहाखातर तव्यावरची भाकरीच फिरविल्याची चर्चा मंगळवारी राजकीय वर्तुळात सुरू होती. जिल्हा परिषदेत ६४ पैकी ४० जागा ताब्यात मिळविणारा राष्ट्रवादी पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला असून, पक्षाने बहुमतही मिळविले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते व विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, आमदार शशिकांत शिंदे यांनी सोमवारी राष्ट्रवादीच्या नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्यांची बैठक जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानी घेतली होती. या बैठकीला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, आमदार नरेंद्र पाटील, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, आमदार दीपक चव्हाण, जिल्हाध्यक्ष सुनील माने, माजी आमदार प्रभाकर घार्गे, शेखर गोरे, बाळासाहेब भिलारे, प्रतापराव पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीमध्ये पक्षनेत्यांनी नवनियुक्त सदस्य व त्यांच्या कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. प्रत्येक तालुक्यातील सदस्यांशी टप्प्याटप्प्याने चर्चा करण्यात आली. सोमवारी रात्री उशिरा सर्व आमदार याबाबत सविस्तर चर्चा केल्यानंतर चर्चेतील तीन नावे बारामतीला पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे कळविली गेली होती. मंगळवारी सकाळी पुन्हा अध्यक्षांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली. या बैठकीतच अध्यक्ष व उपाध्यक्षांचे नाव जाहीर केले गेले. अध्यक्षपदासाठी संजीवराजे नाईक-निंबाळकर तर उपाध्यक्षपदासाठी वसंतराव मानकुमरे यांची निवड करण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचे दावेदार ठरविण्यासाठी आज झालेल्या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत अध्यक्षपदासाठी संजीवराजेंचे नाव सर्वानुमते ठरले. पण उपाध्यक्षपदावरून विक्रमसिंह पाटणकर व आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यात खडाजंगी झाली. अगदी शरद पवारांना थेट फोनवर बोलून शिवेंद्रसिंहराजेंनी मानकुमरेंचे उपाध्यक्षपद मिळवले. तर शिक्षण सभापतिपदाला मान्यता देत विक्रमसिंह पाटणकरांनी नमते घेतले. शिवेंद्रसिंहराजेंनी मानसिंगराव जगदाळेंची समजूत काढताना ‘यापुढे आम्ही तुमच्या पाठीशी राहू,’ असा शब्द दिल्याने वादावर पडदा पडला.
या बैठकीला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, ज्येष्ठ नेते विक्रमसिंह पाटणकर, प्रदेश पक्षप्रतोद आमदार शशिकांत शिंदे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, दीपक चव्हाण, नरेंद्र पाटील, सुनील माने, बाळासाहेब भिलारे तसेच अध्यक्षपदाचे दावेदार संजीवराजे नाईक-निंबाळकर, वसंतराव मानकुमरे, मानसिंगराव जगदाळे, सुरेंद्र गुदगे, राजेश पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. प्रारंभी अध्यक्षपदासाठी संजीवराजे नाईक-निंबाळकर यांचे नाव निश्चित केल्याचे आमदारांनी सांगितले. या निर्णयाला कोणीही विरोध केला नाही. सर्वांनी मान्यता दिल्याने उपाध्यक्षपदासाठीची रस्सीखेच सुरू झाली. सुरुवातीलाच विक्रमसिंह पाटणकर यांनी भूमिका मांडताना आम्हाला पक्षश्रेष्ठी शरद पवार यांनी शब्द दिला आहे, असे सांगितले. हे ऐकल्यानंतर वसंतराव मानकुमरे नाराज होऊन बैठकीतून बाहेर गेले. मात्र, आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या शब्दाखातर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी राजेश पवार यांचे नाव मागे सारून वसंतराव मानकुमरे यांना उपाध्यक्षपदी संधी देण्याची सूचना केल्याने मानकुमरेंचा मार्ग मोकळा झाला. (प्रतिनिधी)
शिवेंद्रसिंहराजेंच्या आक्रमकपणामुळे मानकुमरेंच्या गळ्यात माळ
माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी राजेश पवार यांचेच नाव निश्चित करावे, असा मुद्दा मांडला. पाटणला राष्ट्रवादीचा आमदार नाही. त्यामुळे उपाध्यक्षपद दिल्यास ते पक्षासाठी फायद्याचे ठरणार असल्याची मांडणी त्यांनी केली. यावरून आमदार शिवेंद्रसिंहराजे चांगलेच संतप्त झाले. आम्ही खासदारांना अंगावर घ्यायचे पक्षासाठी झटायचे आणि तुम्ही पाटणला पद द्यायचे योग्य नाही. वसंतराव मानकुमरेंनाच उपाध्यक्षपद मिळाले पाहिजे. या वादात हस्तक्षेप करत रामराजे म्हणाले, ‘शरद पवारांनीच राजेश पवार यांचे नाव उपाध्यक्षपदासाठी घेण्यास सांगितले आहे. यावर शिवेंद्रसिंहराजे अधिकच आक्रमक झाले. यावेळी शिवेंद्रसिंहराजेंना आमदार नरेंद्र पाटील यांनी साथ देत ‘तुम्ही शरद पवार यांच्याशी का बोलत नाही, मोबाईलवरून पवार यांच्याशी बोला,’ असे सांगितले. त्यानंतर वसंतराव मानकुमरे बैठकीतून बाहेर उठून गेले. याच दरम्यान, शिवेंद्रसिंहराजेंनी शरद पवारांशी मोबाईलवरून संपर्क साधून ‘आगामी लोकसभेची निवडणूक सोपी होण्यासाठी जावळीला पद दिले पाहिजे. आम्ही खासदारांविरोधात भूमिका घेतली आहे. पक्षासाठी मानकुमरेंनी खासदारांविरोधात भूमिका घेत दगडे झेलली आहेत. त्यामुळे पक्षाने याचा विचार करून मानकुमरेंना संधी द्यावी,’ अशी भूमिका मांडली. पवारांनीही हा युक्तिवाद मान्य केला. शिवेंद्रसिंहराजेंनी आपला फोन रामराजेंकडे दिला. ‘जावळीला उपाध्यक्षपद द्यावे लागेल,’ अशी सूचना पवारांनी रामराजेंना केली. त्यानंतर उपाध्यक्षपदावरून पाटणचे नाव खुडून जावळीचे वसंतराव मानकुमरे यांचे नाव पुढे आले.
मानसिंगराव जगदाळेंना डावलले
मानसिंगराव जगदाळेंना उपाध्यक्ष पद द्यावे, म्हणून आमदार शशिकांत शिंदे व सुनील मानेंनी भूमिका मांडली. पण त्याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले. बैठकीच्या सुरुवातीला माणला उपाध्यक्षपद देण्यासाठी शेखर गोरेंनीही आग्रह धरला होता. पण पोळ तात्यांच्या सुनेला महिला व बालकल्याण सभापतिपद दिले जाणार असल्याने व माण माढा मतदार संघात येत असल्याने एकाच मतदार संघात दोन पदे देता येत नसल्याचे रामराजेंनी सांगितल्याने शेखर गोरे शांत झाले. यानंतर आमदार शशिकांत शिंदे व रामराजेंनी भूमिका मांडून दोघांची नावे निश्चित झाल्याचे स्पष्ट केले.
मानसिंगरावांसाठी मकरंद आबांचे प्रयत्न
मसूरच्या मानसिंगराव जगदाळे यांना डावलले गेल्यानंतर ते वाईचे आमदार मकरंद पाटील यांच्यापाशी जाऊन बसले. मकरंद आबा, प्रतापराव पवार आदींनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. आबांनी तर थेट फोनाफोनी चालू केली. याचा परिपाक म्हणून जगदाळेंना किमान सभापतिपद तरी मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी धरली आहे.
उपाध्यक्षपद दिले खूश आहात का?
जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदासाठी हटून बसलेल्या वसंतराव मानकुमरेंकडे पाहून पद दिले, आता खूश आहात का?, असा सवाल रामराजेंनी विचारल्यानंतर मानकुमरेंची अशी भावमुद्रा पाहायला मिळाली.