रानमेव्यानं भरलंय रान.. तोंडाला सुटतंय पान..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:36 AM2021-05-15T04:36:33+5:302021-05-15T04:36:33+5:30
पाचगणी : मे महिना म्हटलं की उन्हाची लाहीलाही असते, तर त्याच उन्हाचा शीण घालविण्याकरिता निसर्गात याच वेळेस विविध प्रकारचा ...
पाचगणी : मे महिना म्हटलं की उन्हाची लाहीलाही असते, तर त्याच उन्हाचा शीण घालविण्याकरिता निसर्गात याच वेळेस विविध प्रकारचा रानमेवा रानावनात फुलतो. आता हा पाचगणीलगतचा परिसर अनेक प्रकारच्या रानमेव्यांनी बहरून गेलाय. दरवर्षी देशी-विदेशी पर्यटकांच्या जिभेची चव भागविणारा रानमेवा यावर्षी बाजारपेठेऐवजी रानातच पडून राहिल्याने स्थानिकांना मात्र लॉकडाऊनमध्ये रानावनात येण्यास खुणावू लागलंय.
महाबळेश्वर तालुका म्हटलं की, वनराईने नटलेला. यामध्ये अनेक प्रकारच्या रानफळांसाठी प्रसिद्ध आहे. प्रत्येक हंगामात येथे कोणते ना कोणते रानमेव्याचे फळ येणारच आणि ते येथे येणाऱ्या पर्यटकांस चाखायला मिळणारच, हे ठरलेलंच आहे. स्ट्रॉबेरीच्या तालुक्यात हंगामी रानमेव्याला अजिबात कमी नाही. आता मे महिन्यात महाबळेश्वर तालुक्याच्या डोंगररांगात नुकतंच विविध प्रकारचा रानमेवा उपलब्ध झाला आहे.
यामध्ये गुजबेरी, राजबेरी, करवंदे, तोरणे, जांभळे यांनी रानमेव्याच्या फळांनी डोंगर रांगा बहरून गेल्यात. परंतु, लॉकडाऊन असल्याने पर्यटक नसल्याने हा रानमेवा जंगल कपारीत पडूनच आहे. स्थानिक लॉकडाऊन असल्याने हा रानमेवा आता पर्यटकांविना रानातच पडून राहिलाय. आता चक्क स्थानिकांना खुणावू लागलाय.
चौकट :
पर्यटकांकडून पसंती...
उन्हाळ्यात येणाऱ्या या रानमेव्याला पर्यटक अधिक पसंती देतात. पर्यटन हंगामात येणारा हा रानमेवा आहे. अनेक कुटुंबे उन्हाळ्यात रानावनात फिरून रानमेवा टोपलीत गोळा करून पाचगणी महाबळेश्वरच्या बाजारपेठांत विकून आपला उदरनिर्वाह करतात.
(चौकट)
लॉकडाऊनमुळे रानमेवा झाडावरच..
आता मात्र लॉकडाऊन असल्याने आणि पर्यटक नसल्याने हा रानमेवा यावर्षी रानातच पडलाय. अनेक ठिकाणी स्थानिक मात्र संध्याकाळच्या वेळेस लगतच्या रानावनात जाऊन या रानटी रानमेव्याचा आस्वाद चाखत आहेत.