अल्हाददायक वातावरणात रंगला कर्तृत्वशलाखांचा गौरव सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:37 AM2021-02-14T04:37:42+5:302021-02-14T04:37:42+5:30

सातारा : महाबळेश्वरची बोचरी थंडी... अल्हाददायक वातावरण... कर्तृत्ववान महिलांच्या स्वागतासाठी सज्ज असलेले सभागृह... मान्यवरांची उपस्थिती आणि कार्यकर्तृत्व गाजविणाऱ्या महिलांच्या ...

Rangala Kartratvashalakha's glorious ceremony in a pleasant atmosphere | अल्हाददायक वातावरणात रंगला कर्तृत्वशलाखांचा गौरव सोहळा

अल्हाददायक वातावरणात रंगला कर्तृत्वशलाखांचा गौरव सोहळा

Next

सातारा : महाबळेश्वरची बोचरी थंडी... अल्हाददायक वातावरण... कर्तृत्ववान महिलांच्या स्वागतासाठी सज्ज असलेले सभागृह... मान्यवरांची उपस्थिती आणि कार्यकर्तृत्व गाजविणाऱ्या महिलांच्या मांदियाळीने लोकमत वुमन आयकॉन्स ऑफ साताराचा गौरव सोहळा उत्साहात पार पडला.

महाबळेश्वर येथील हॉटेल गौतमच्या सभागृहात हा दिमाखदार सोहळा पार पडला. शिवसेनेच्या अभ्यासू नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा रंगला. अध्यक्षस्थानी खासदार श्रीनिवास पाटील होते. कार्यक्रमास आमदार मकरंद पाटील यांच्यासह ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, जाहिरात व्यवस्थापक राम जोशी, वरिष्ठ शाखा व्यवस्थापक संतोष भागशेट्टी, मुख्य उपसंपादक दीपक शिंदे, इव्हेंट हेड दीपक मनाठकर, जाहिरात उपव्यवस्थापक संतोष जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वातंत्र्यसेनानी दिवंगत जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणाऱ्या कंपनीचे नेतृत्व करणाऱ्या महिलेपासून आधूनिक शेती करणारी, सूत्रसंचालनाच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्यांसह स्वयंपाक घरातील साहित्य करणाऱ्या आणि आहार कसा असावा याचेही मार्गदर्शन करणाऱ्या २५ महिलांचा गौरव उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सुमारे अडीच तास चाललेल्या या कार्यक्रमात महिला शक्तीचा आणि कर्तृत्वाचा जागर उपस्थितांनी अनुभवला.

चौकट :

१. सेल्फी पॉईंट

लोकमत वुमन आयकॉन्स ऑफ सातारा सोहळ्याच्यानिमित्ताने आलेल्या महिलांसाठी कार्यक्रमस्थळी सेल्फी पॉईंट ठेवण्यात आला होता. कार्यक्रमापूर्वी सहकुटुंब आणि नंतर ट्रॉफीसह महिलांनी येथे सेल्फी काढण्याचा आनंद घेतला. एकापेक्षा अधिक महिला तेथे गेल्यामुळे काहींना वेटिंगही करावं लागलं.

२. प्रत्येक सन्मानमूर्तीची खास ओळख

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या वक्तृत्वाबरोबरच त्यांचा लोकसंग्रह आणि स्मृतीचाही अनुभव या कार्यक़्रमाच्या निमित्ताने उपस्थितांना अनुभवायला मिळाला. पुरस्कार प्राप्त महिलांबरोबरच त्यांचे माहेर - सासर, त्यांचे व्यवसाय, त्यांची मुलंबाळं, आदी अनेक छोट्यामोठ्या माहितीचा खजिनाच त्यांच्याकडे होता. त्यामुळे सत्कार स्वीकारायला येणाऱ्या प्रत्येक सन्मानमूर्तीकडे ते कुटुंबवत्सलपणे चौकशी करत होते.

३. खासदारांची क्रेझ

लोकमत वुमन आयकॉन्स ऑफ सातारा सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक़्रमात खासदार श्रीनिवास पाटील यांची क्रेझ पुन्हा एकदा पाहायला मिळाली. या सोहळ्यात सन्मान स्वीकारणाऱ्या प्रत्येक कर्तृत्ववान महिलेने त्यांच्याबरोबर फोटो काढला. खासदार पाटील यांनीही प्रत्येकाला हसून पोझ दिली. चंद्राबेन शहा, वैशाली भट या ज्येष्ठांसह मनीषा कूपर आणि डॉ. भाग्यश्री शिंदे यासारख्या कर्तृत्ववान तरुणींनाही त्यांच्यासोबतचा क्षण स्वतंत्रपणे टिपून ठेवला.

४. आम्ही केलं, पण तुम्ही मांडलत

आमच्यावर आणि कुटुंबावर आलेली वेळ लक्षात घेऊन आम्ही आमच्या भूमिका पार पाडल्या. याला साध्या सोप्या भाषेत कोणी व्यवसाय म्हणतं, तर कोणी त्याला कर्तृव्याचं नाव देतं. दैनंदिन आयुष्य जगण्यासाठी आवश्यक कृती करण्याचं काम आम्ही केलं; पण त्याची दखल घेऊन त्याचा गौरव करण्याचं मोठेपण तुम्ही दाखवलं, असे सांगत अनेक महिलांनी ‘लोकमत’चे आभार मानले.

५. हॉटेल गौतम कर्तृत्ववान महिलांनी बहरले!

महाबळेश्वर येथील हॉटेल गौतममध्ये लोकमत ‘वुमन आयकॉन ऑफ सातारा’ हा सन्मान सोहळा रंगला. या सोहळ्यासाठी जिल्ह्यातील निवडक २५ कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला. सकाळपासूनच महिलांचे कार्यक्रमस्थळी आगमन होत होते. त्यामुळे हॉटेल परिसर या कर्तृत्वशलाखांच्या उपस्थितीने बहरून गेला होता. येणाऱ्या प्रत्येकाला उत्तम सेवा देण्यासाठी हॉटेलचे व्यवस्थापक रमेश कौल यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे कर्मचारी प्रयत्नशील होते.

६. यांचा झाला सन्मान

सातारा जिल्ह्यातील २५ कर्तृत्ववान महिलांना ‘लोकमत’ वुमन आयकॉन्स ऑफ साताराने सन्मानित करण्यात आले. यात अ‍ॅड. मधुबाला भोसले, दीपाली भागवत, वैशाली भट, प्रतिमा चव्हाण, मनीषा कूपर, डॉ. स्वाती देशपांडे, रश्मी एरम, शोभना गुदगे, माधवी कदम, सुनीता कदम, मंजिरी खुस्पे, अनुराधा कोल्हापुरे, स्वाती ओक, डॉ. मनीषा पाटील, सुवर्णादेवी पाटील, प्रीती रेवले, कांचन साळुंखे, चंद्राबेन शहा, डॉ. भाग्यश्री शिंदे, रूपल तेजानी आणि सिलीन वायापुली यांचा गौरव करण्यात आला. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे वेदांतिकाराजे भोसले या स्वत: कार्यक़्रमाला उपस्थित राहू शकल्या नाहीत. त्यांच्यावतीने नगरसेविका दीपलक्ष्मी नाईक आणि लीना गोरे यांनी, तर मारोख कूपर यांच्यावतीने मनीषा कूपर यांनी सन्मान स्वीकारला. स्वप्नाली शिंदे आणि चेतना सिन्हा यांचाही प्रातिनिधिक सत्कार झाला. यावेळी तहसीलदार सुषमा पाटील, मुख्याधिकारी पल्लवी पाटील, लोकमतचे महाबळेश्वरचे ज्येष्ठ प्रतिनिधी रमेश पल्लोड, हॉटेल गौतमचे रमेश कौल यांचाही सत्कार करण्यात आला.ढ़

१३सातारा-लोकमत०२

महाबळेश्वर येथे शनिवारी ‘लोकमत वुमेन आयकॉन्स ऑफ सातारा’ या पुरस्काराने २५ कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला. यावेळी या महिलांसह विधान परिषदेच्या उपाध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील, ‘लोकमत’ संपादक वसंत भोसले, वरिष्ठ सर व्यवस्थापक मकरंद देशमुख आदी उपस्थित होते. (छाया : जावेद खान)

Web Title: Rangala Kartratvashalakha's glorious ceremony in a pleasant atmosphere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.