कास पठारावर रानगव्याच्या कळपाचे दर्शन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2022 01:10 PM2022-01-08T13:10:04+5:302022-01-08T13:10:49+5:30
दुर्मिळ रानगवे कास पठार परिसरात पाहायला मिळाल्याने पर्यटकांना, वाहनचालकांना आज पर्वणीच ठरली.
पेट्री : जागतिक वारसास्थळ कास पठारावर शनिवारी सकाळी रानगव्यांच्या कळपाचे दर्शन झाले. सकाळी दाट धुक्यात सूर्यकिरणे अंगावर झेलत चौदा रानगव्याच्या कळपाचे दर्शन झाले. परिसरात बऱ्याचदा रानगवे दिसतात. शनिवारी सकाळी चक्क या महाकाय रानगव्यांच्या कळपाचे दर्शन बहुतांशी वाहनचालक दूरवर गाडी उभी करून घेताना दिसत होते. काही वाहनचालकांनी चारचाकीतूनच रानगव्याची छबी कॅमेऱ्यात टिपली.
शहराच्या पश्चिमेला २५ किमी अंतरावर कास पठार जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ आहे. नेहमीच जिल्ह्यातील इतर जिल्ह्यातील बहुसंख्य पर्यटकांच्या गर्दीने कास पठार परिसर बहरलेले दिसते. त्यात कधीही पाहण्यास न मिळालेले दुर्मिळ रानगवे कास पठार परिसरात पाहायला मिळाल्याने पर्यटकांना, वाहनचालकांना आज पर्वणीच ठरली.
बैल कुळातील गवा सर्वात मोठा प्राणी असून कास परिसरातील दाट, घनदाट जंगलात त्याचे कळपाने वारंवार दर्शन घडल्याचे स्थानिकांमधून बोलले जाते. यापूर्वी बहुतांशी वेळा परिसरातून प्रवास करताना वाहनचालक उत्सुकतेपोटी या गव्यांची छायाचित्रे काढतात खरं ! परंतु कोणत्याही क्षणी गव्याचा हल्ला होऊ शकतो या हेतूने अगोदरच वाहने वळवून लावण्याची त्यांची धडपड दिसते.
कास पठार हे मोठ्याप्रमाणावर जैवविविधता असलेले ठिकाण आहे. निसर्गसौंदर्य, चोहोंबाजुला हिरवीगार दाट झाडी, निसर्गाचे वरदान असलेल्या कास पर्यटनस्थळी रानगव्यांचे वारंवार झुंड दिसत असल्याने काहींना याची पर्वणी तर काहींची भंबेरी उडताना दिसते. कासच्या दाट जंगलात गव्यांचा वावर आहे. पाणवठयाच्या ठिकाणी गव्यांचा कळप बहुतांशीवेळा पाहावयास मिळतो.
वन्यप्राण्यांचा मार्गात अडथळा नको
अचानक रानगवे समोर आले तर त्यांची कोणतीही चेष्टा तसेच दगड अथवा काहीही वस्तु फेकू नये. त्याला चिडविण्याचा देखील प्रयत्न करू नये. त्यांच्या मार्गात अडथळा उभा न करता ते तेथून शांतपणे निघून जातात. परंतु त्यांना त्रास दिला गेल्यास ते हल्ला करतात. रानगवा समोर दिसल्यास पर्यटकांनी तेथून दूर जावे. पर्यटनप्रसंगी वन्यपशुंपासुन सावध राहावे असे स्थानिक ग्रामस्थांतून बोलले जाते.
सातारा कास बामणोली मार्गावर नेहमीच वन्यजीवांचा मुक्तसंचार असतो. सरपटणारे प्राणी, अनेकविध वन्यजीव निर्भिडपणे रस्त्याच्या आसपास, रस्त्याच्या एकाबाजुकडून दुसऱ्या बाजुकडे सहज संचार करत असतात. वन्यजीवांना त्यांचे जीवन जगत असताना कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता मानवाने घेणे महत्वाचे आहे. - अभिषेक शेलार/कास पठार समिती कर्मचारी