लोणंदमध्ये गांधीगिरी : रांगोळी काढलेला रस्ता खड्डेमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 10:29 PM2019-09-27T22:29:33+5:302019-09-27T22:30:02+5:30

हे आंदोलन बांधकाम विभागास जागे करण्यासाठी शांततेच्या मार्गाने करण्यात आले. रस्त्यावर वाहनचालकांना खड्ड्यांच्या बाजूने रांगोळी काढून स्वागत व वाहनचालकांना खड्डे दिसावेत, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.

 Rangoli road ditch free | लोणंदमध्ये गांधीगिरी : रांगोळी काढलेला रस्ता खड्डेमुक्त

लोणंदमध्ये गांधीगिरी : रांगोळी काढलेला रस्ता खड्डेमुक्त

googlenewsNext
ठळक मुद्देसार्वजनिक बांधकाम विभागाकडूनही सकारात्मकतेने दखल

लोणंद : ‘खड्डेमय लोणंद शहरात आपले स्वागत...’ असे म्हणत खड्ड्यांभोवती रांगोळी काढून नागरिकांनी गांधीगिरी केली. त्याला बांधकाम विभागानेही तेवढेच सकारात्मक नजरेने पाहून अवघ्या पाच तासांत कार्यवाही करत खड्ड्यांमध्ये मुरूम टाकला.

लोणंद मराठी पत्रकार संघ व साथ प्रतिष्ठानच्यावतीने लोणंदमधील खड्ड्यांभोवती शुक्रवारी रांगोळी काढून गांधीगिरी केली होती. हे आंदोलन बांधकाम विभागास जागे करण्यासाठी शांततेच्या मार्गाने करण्यात आले. रस्त्यावर वाहनचालकांना खड्ड्यांच्या बाजूने रांगोळी काढून स्वागत व वाहनचालकांना खड्डे दिसावेत, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
लोणंद येथील बसस्थानकासमोर एक फूट खोलीचे खड्डे पडले असून, या ठिकाणी दररोज अपघात होत आहेत. खड्ड्यांमुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने दहा दिवसांत खड्ड्यांमध्ये पडल्याने पंधराजणांना गंभीर दुखापत झाली होती.

लोणंद येथील पुणे-सातारा रस्त्यावरील खड्डे बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी तसेच वाहनधारकांना अतिशय खोलगट खड्डे दिसावेत म्हणून लोणंद बसस्थानकासमोरील खड्ड्यांच्या सभोवती रांगोळी काढून सुस्वागतम... असे लिहिले होते.

वारंवार होत असलेल्या अपघातांची गंभीर दखल घेण्याबाबत साथ प्रतिष्ठान व लोणंद मराठी पत्रकार संघ तसेच लोणंदमधील विविध क्षेत्रातील मान्यवर, संघटनांनी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला होता.
या उपक्रमानंतर लगेचच बांधकाम विभागाने कार्यवाही करीत लोणंद शहरातून जाणारे खड्डे मुजविण्याचे काम हाती घेऊन रस्ते खड्डेमुक्त केल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. डांबरीकरण लवकरात लवकर करुन रस्ते चकाचक करावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.

पाऊस थांबल्यावर डांबरीकरण...
सततच्या पावसामुळे रस्त्याची ही दुर्दशा झाली आहे. सध्या मुरूम टाकून खड्डे मुजविण्यात आले असून, पाऊस थांबल्यानंतर डांबरीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती खंडाळ्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एम. वाय. मोदी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

लोणंद येथे शुक्रवारी खड्ड्यांभोवती रांगोळी काढून गांधीगिरी आंदोलन केले. त्यानंतर सायंकाळी मुरूम टाकून खड्डे मुजविण्यात आले.

Web Title:  Rangoli road ditch free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.