रामराजेंच्या कमरेला लंगोटही राहणार नाही, रणजितसिंह नाईक-निंबाळकरांची घणाघाती टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 12:28 PM2023-10-03T12:28:28+5:302023-10-03T12:29:32+5:30
स्वराज समूहावर बोलण्याचा तुम्हाला अजिबात अधिकार नाही
फलटण (सातारा) : ‘बापजाद्यांनी काढलेल्या संस्था दुसऱ्यांना चालवायला दिल्या अन् प्रश्न विचारला म्हणून शेतकऱ्यांच्या मुलांचे पाय काढायला निघालाय. पण जनतेने रौद्र रूप धारण केले तर रामराजे तुमच्या कमरेला लंगोटसुद्धा राहणार नाही,’ असा घणाघात माढाचे भाजप खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केला.
दरम्यान, माझ्या स्वराज समूहावर बोलण्याचा तुम्हाला अजिबात अधिकार नाही, श्रीराम सहकारी साखर कारखान्यापेक्षा जास्त दर देतो, तर देशातील सर्वांत मोठी डिस्टिलरी ही स्वराजमध्ये आहे, असेही रणजितसिंह यांनी स्पष्ट केले.
फलटण येथे सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर म्हणाले, ‘श्रीराम साखर कारखान्यासंदर्भात प्रश्न विचारला म्हणून माजी आयएएस अधिकारी विश्वासराव भोसले यांना पाय काढण्याची भाषा करताय. त्यांच्या केसाला हात लावला तर गाठ माझ्याशी आहे. तीन दिवसांपूर्वी श्रीराम कारखान्याच्या सभेत जे स्वतःला अधिपती समजणारे रामराजे यांनी विश्वासराव भोसले यांना पाय काढण्याची भाषा वापरली.
मी कधीही सहकारात राजकारण नको म्हणून कारखाना, मार्केट कमिटी, दूध संघात हस्तक्षेप केला नाही. निवडणुका लावण्याचा प्रयत्न केला नाही किंवा अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला नाही. नव्याने संस्था उभारल्या आणि त्या हिमतीने चालविल्या. संस्था स्वतः चालवीत नाहीत. जवाहरच्या कुबड्या घेतल्यात. पंधरा वर्षे त्याचा हिशोब नाही. जमिनी विकल्यात, अजून कर्ज किती राहिले ते माहिती नाही. ज्या कारखान्याला १२ ते १५ कोटी रुपये दरवर्षी मिळायला पाहिजेत ते मिळत नाहीत.’