रंक असो वा राव... संस्थात्मक विलगीकरण हाच पर्याय !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:39 AM2021-05-26T04:39:08+5:302021-05-26T04:39:08+5:30
शासनाचा निर्णय : महामारी रोखण्यासाठी आता कोणताही दुजाभाव नको सागर गुजर लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये ...
शासनाचा निर्णय : महामारी रोखण्यासाठी आता कोणताही दुजाभाव नको
सागर गुजर
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना वाढीचा दर जास्त आहे अथवा जे जिल्हे रेड झोनमध्ये आहेत, अशा जिल्ह्यांमध्ये गृह विलगीकरण पूर्णतः बंद करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे. सातारा जिल्ह्यात या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या परिस्थितीमध्ये रुग्णाची आर्थिक परिस्थिती न बघता सर्वांनाच संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे.
कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर अत्यवस्थ रुग्णांना रुग्णालयात, तर सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणामध्ये राहण्याची सक्ती आहे. मात्र अनेक ठिकाणी गृह विलगीकरण केलेले रुग्ण नियम डावलून रस्त्यावर फिरताना आढळले. चौदा दिवसांचा कालावधी पूर्ण न करता अनेकजण लोकांमध्ये मिसळल्याने संसर्ग वाढला. तसेच घरामध्ये विलगीकरणाची सोय नसल्याने अनेकांना घरातूनच संसर्ग झाला. या पार्श्वभूमीवर कोरोनाबाधित रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणामध्ये ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
जिल्ह्यातील सरकारी शाळा, ग्रामपंचायतींच्या इमारती, सामाजिक भवन, गावापासून दूर असलेले मंगल कार्यालय याठिकाणी संस्थात्मक विलगीकरणाच्या तयारीला वेग आलेला आहे. विलगीकरण सेंटरमध्ये पाण्याची सुविधा स्वतंत्र टॉयलेट, बाथरूम, ऑक्सिजन मशीन, पंखे, टीव्ही या बाबींची तरतूद केली गेली, तर लोक १४ दिवसांचा कालावधी आनंदाने पूर्ण करतात, याचा अनुभव अनेक गावांनी घेतला आहे. आता त्यादृष्टीने प्रशासनाने पावले उचलली आहेत.
बाधितांच्या हातावर शिक्के कधी मारणार
जिल्ह्यामध्ये रोज २००० एवढ्या मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यापैकी बहुतांश बाधित रुग्ण हे गृह विलगीकरणामध्ये असतात. आता सरकारच्या निर्णयामुळे ते संस्थात्मक विलगीकरणात जातील; परंतु जिल्हा प्रशासनाने बाधितांच्या हातावर विलगीकरणाचे शिक्के मारणे बंद केले असल्यामुळे बाधित कोण आणि सुदृढ कोण, यातील फरक कळत नाही आणि बाधित लोक सुदृढ लोकांच्या संपर्कात येऊन संसर्ग वाढतो आहे. प्रशासनाने याबाबत गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.
नागझरी गावातील रोल मॉडेल
कोरेगाव तालुक्यातील नागझरी या गावामध्ये वीस रुग्ण सापडल्यानंतर तेथील ग्रामपंचायतीने सरपंच जितेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ संस्थात्मक विलगीकरण सुरू केले. गावातील मुक्ताबाई भोसले हायस्कूलमध्ये ३५ बेडचा आयसोलेशन वॉर्ड सुरू करण्यात आला आहे. त्या ठिकाणी ग्रामपंचायत आणि लोकसहभागाच्या माध्यमातून आधुनिक असा आयसोलेशन वॉर्ड सुरू केला. आयसोलेशन वॉर्डमध्ये पंखे, टीव्ही बसविण्यात आला. येथील टॉयलेटची देखील दुरुस्ती करून घेण्यात आली. नागझरीचे रोल मॉडेल संपूर्ण जिल्ह्यात राबवले, तर संसर्ग रोखणे शक्य होईल.
जिल्ह्यात गृह विलगीकरणात असलेले रुग्ण : १२ हजार
रुग्णालयात दाखल रुग्ण : ३ हजार ५००